मुंबई : ज्योत (इंडिया) संस्थेच्या वतीने आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ चे आयोजन १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे संमेलन जैनाचार्य योगभूषणसूरीजी महाराज (७९वे आध्यात्मिक अधिपती) यांच्या पावन मार्गदर्शनाखाली आयोजित होत असून, सध्याचा जागतिक काळ हा संक्रमणाचा काळ म्हणून ओळखला जातो. जगभरात अस्थिरता, विश्वासाचा ऱ्हास, मूल्यांची गळती आणि व्यवस्थात्मक बदल सुरू असताना, भारताच्या सभ्यतागत, नैतिक आणि आध्यात्मिक परंपरेवर आधारित मार्गदर्शनाकडे जागतिक पातळीवर आशेने पाहिले जात आहे.
भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेतून उद्भवलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेतील १२ शाश्वत तत्त्वांवर हे संमेलन आधारित आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जागतिक स्तरावर शाश्वत, न्याय्य व संतुलित व्यवस्था उभारण्यासाठी भारताचे ठोस योगदान मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे संमेलन चौथ्या वर्षात पदार्पण करत असून, याआधीच्या आवृत्त्यांद्वारे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली आहे.
ग्लोबल साऊथ व वेस्ट आशियातील २३ देशांच्या दूतावासांपुढे निष्कर्ष सादर करणे, आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून येरेवान डायलॉग २०२४ साठी निमंत्रण, तसेच संयुक्त राष्ट्रसंघात राजदूत रुचिरा कंबोज आणि UNGA अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्याशी संवाद, ही त्याची ठळक उदाहरणे आहेत.
संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये : कायदा, शासन, भू-राजकारण, अर्थव्यवस्था, समाज व नैतिकता यांवर आधारित १० विषयक सत्रे, न्यायाधीश, राजनयिक, धोरणकर्ते, अभ्यासक व विचारवंतांसोबत गोलमेज परिषद चर्चा, २५,००० चौ. फूट क्षेत्रफळाचे संशोधनाधारित प्रदर्शन – वसुधैव कुटुंबकम् ची १२ तत्त्वे सादर, भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवासाठी विशेष कायदेशीर प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्ट, मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN), स्ट्रीट प्ले, नालंदावाद आणि दररोज पॉडकास्ट सत्रे – शिक्षण, पर्यावरण, माध्यमे, प्रशासन, उद्योजकता विषयांवर संवाद.
या संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये माजी सरन्यायाधीश न्या. बी. आर. गवई, माजी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश न्या. बी. एन. श्रीकृष्णा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. श्री चंद्रशेखर, संयुक्त राष्ट्रसंघातील माजी भारतीय राजदूत रुचिरा कंबोज, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातनाम विचारवंतांचा समावेश आहे.
गीताार्थ गंगा, विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, इंडिया फाउंडेशन, नालंदा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, गोखले अर्थशास्त्र संस्था, डी. वाय. पाटील विद्यापीठ, निर्मा लॉ युनिव्हर्सिटी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, बॉम्बे बार असोसिएशन आदी अनेक नामांकित संस्था या उपक्रमास पाठबळ देत आहेत.
आयोजकांच्या मते, भारताच्या सभ्यतागत मूल्यांवर आधारित १२ सूत्रीय मार्गदर्शन नव्या जागतिक व्यवस्थेसाठी दिशादर्शक ठरेल आणि नागरिकांना समकालीन कायदेशीर, सामाजिक व नैतिक प्रश्नांवरील उपाय प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देईल.

