मुंबई/बुलढाणा: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी पक्षाने वैचारिक लढाई ठामपणे लढली आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या निर्धाराच्या जोरावर काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. पाच शहरांत काँग्रेसचे महापौर, ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले,
“संक्रांतीच्या पर्वावर पार पडलेल्या या निवडणुकांत काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जिथे शक्य होते तिथे स्वबळावर, तर काही ठिकाणी आघाडी करून आम्ही संघटनात्मक आणि वैचारिक मजबुतीसाठी निवडणूक लढवली. सत्ताधारी भाजप महायुतीने पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला, बोगस मतदान झाले. तरीही भाजपच्या बुलडोझर राजकारणासमोर काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.”
ते पुढे म्हणाले, “हा काळ संघर्षाचा आणि वैचारिक लढाईचा आहे. अपयशाने खचून न जाता पुढील लढाईसाठी काँग्रेस सज्ज आहे. लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांसाठी आम्ही लढत राहू.”
मुंबईतील भाजपाचा विजय ‘फिक्सिंग’मुळे – आरोप
मुंबईतील भाजपाच्या यशावर टीका करताना सपकाळ म्हणाले,
“मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे पूर्णपणे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचना, ‘पाडू’ मशिन, शाईचा घोळ – हे सगळे फिक्सिंगचाच खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर आणि भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे थांबवावे.”
“भाजपाकडे आता कसलीही नैतिकता उरलेली नाही. पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी आणि निवडणूक आयोगाचा गलथान कारभार पाहता फ्री अँड फेअर निवडणुका झाल्याच नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
हुकूमशाहीवर टीका करताना ते म्हणाले, “हुकूमशाही वाढतच जाते, पण एका टप्प्यावर तिचा फुगा फुटतो. आता तो क्षण जवळ आला आहे. उत्तरायण सुरू झाले असून पुढचा काळ भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा ठरेल.”
भाजपाच्या विजयाचे वर्णन करताना सपकाळ म्हणाले, “करून घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते सत्तेचा फेटा.”

