महाराष्ट्र ताज्या बातम्या

Election Day: “बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय” – उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली.

“मतदान हा आजचा नवा विषय नाही. पण यंदा पहिल्यांदाच मुंबईसह काही महानगरपालिकांमध्ये मतदारांच्या बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचे प्रकार समोर आले. याबाबत निवडणूक आयोगाने जाब द्यायला हवा. यामागे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे प्रयत्न असल्याचा संशय आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “कोणत्याही महिलेला ‘रविंद्र’ नाव असतं का? मग असे प्रकार काय दर्शवतात? हा केवळ बोटावरील शाईचा प्रश्न नाही, तर लोकशाही पुसली जातेय.”

आयोगाच्या निष्काळजीपणावर बोट

ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत म्हटले, “देवेंद्र आणि त्यांची टोळी हारली आहे, म्हणून आता त्यांच्या पराभवाची कारणं शोधत आहेत. आधी ईव्हीएम, मग मतदार यादी आणि आता शाई पुसण्याचे प्रकार. मग निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार घेत आहेत?”

मुंबईसह महाराष्ट्रात तब्बल नऊ वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुका होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टपाली मतदानावर संशय

ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक २२६ च्या पत्राचा संदर्भ देत सांगितले की, “टपाली मतदानाचे मतपत्र दुपारी ३ वाजता स्ट्राँग रूममधून बाहेर काढले जाणार आहेत, अशी सूचना आहे. संविधान म्हणते मतदान करा, आणि निवडणूक आयोग म्हणतो ‘करून दाखवा’ – असं सगळं सुरू आहे.”

मुख्यमंत्र्यांनी याला “रडीचा डाव” म्हटल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “अधिकाऱ्यांना तुम्ही घरगडी नेमले आहेत का? त्यांना इतकी मोकळीक कशी काय?”

आज झालेला सगळा गोंधळ हा निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत, “याला जबाबदार धरून थेट निवडणूक आयुक्तांना निलंबित केले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

दुबार मतदारांवर सवाल

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांनी दुबार नावे असलेल्या मतदारांकडून ‘हमीपत्र’ घेतले जाईल, असे सांगितल्याची आठवण करून देत ठाकरे यांनी सवाल केला, “आता किती दुबार मतदारांकडून हमीपत्र मिळाले?”

ते पुढे म्हणाले, “सत्ताधाऱ्यांचे कुभांड आम्ही उघड करत आहोत. थेट दरोडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांचे आणि मतदारांचे हक्क हिरावले जात आहेत.”

आयोगाच्या कर्मचाऱ्यांवरही टीका

“निवडणूक आयोगाचा स्टाफ काय करतो? नुसते बसून राहतात. इतकी वर्षे झाली तरी योग्य नोंदणी होत नाही. आयुक्तांची जबाबदारी असेल, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात