मात्र गावोगावी अजूनही ५ फेब्रुवारीचे फलक; मतदार संभ्रमात
महाड: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने अध्यादेशाद्वारे जाहीर केले आहे. मात्र निवडणूक आयोग व महसूल यंत्रणेकडून गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर लावण्यात आलेल्या मतदार जनजागृती फलकांवर अद्यापही ५ फेब्रुवारी हीच तारीख झळकत असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया दोन दिवसांनी पुढे ढकलत ७ फेब्रुवारी ही नवी तारीख निश्चित केली. मात्र ही माहिती प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी लावण्यात आलेल्या फलकांवरील तारीख बदलण्याची साधी कार्यवाहीही अद्याप करण्यात आलेली नाही.
मतदारांना मतदानाची तारीख व वेळ स्पष्टपणे समजावी, यासाठी लावलेल्या फलकांवरील ५ फेब्रुवारीची तारीख काढून त्याऐवजी ७ फेब्रुवारी अशी नवी तारीख कागदी स्टिकरद्वारे किंवा अन्य पद्धतीने बदलणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने विशेषतः वृद्ध नागरिक व ग्रामीण मतदारांमध्ये “मतदान नक्की ५ फेब्रुवारीला आहे की ७ फेब्रुवारीला?” असा संभ्रम कायम आहे.
या फलकांवरील तारीख तातडीने बदलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी (प्रांत) यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली दिसून येत नाही. वातानुकूलित कॅबिनमध्ये बसून काम करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीचे गांभीर्य नसल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांचा संभ्रम दूर करणे ही निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असताना, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

