उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीने विजयाची हॅट्रिक करून विक्रमच केला आहे. सुरुवातीला नगरपरिषद आणि नगरपंचायती, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका—अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीनही निवडणुकांत दणदणीत विजय मिळवून महायुतीचा भगवा दिमाखात फडकवला आहे.
या निवडणुकीत जनतेने शिवसेनेला सुद्धा भरघोस मते दिली आणि आमच्यावर विश्वास आणखी वाढवल्याने, आम्हीही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निकालांवर जनतेला ग्वाही दिली.
महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भरघोस मते दिल्याने ग्रामीण भागातही आमचा पाया अधिक मजबूत होत चालला आहे, हे स्पष्ट दिसत असून, रायगड आणि रत्नागिरीच्या विजयामुळे कोकणातील जनता खऱ्या शिवसेनेच्या पाठीशीच आहे, हे सिद्ध झाले आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना घराघरात पोहोचवण्याचा मंत्र दिला होता आणि आज त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसते आहे. याप्रसंगी त्यांची ही आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. विशेषतः खेड्यापाड्यातल्या आमच्या लाडक्या भगिनींचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी त्यांच्या लाडक्या भावाला भरभरून प्रेम दिले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महायुतीची विजयाची परंपरा सुरू आहे आणि पुढेही हे प्रेम कायम राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांपासून महायुतीच्या सरकारने शहरी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणारे निर्णय घेतले आहेत—मग ते रस्ते असो, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असो, सिंचन प्रकल्पांना दिलेली गती असो, किंवा शिक्षणाचा वाढवलेला दर्जा असो.
महिलांना आत्मनिर्भर करून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महायुती सरकारने विविध योजना राबवल्या आणि त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांनाही मिळाला. गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक पावले उचलली—केवळ निधीच दिला नाही, तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्तम प्रशासन देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून खेड्यापाड्यातल्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.
आज महायुतीचा विजय होत असताना मला दिवंगत अजितदादा यांची आठवण येते. महायुतीचा विजय आम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच साजरा केला असता, असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
या यशामागे कार्यकर्त्यांची मेहनत, गावागावात केलेले काम आणि लोकांच्या प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही, आणि जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक जबाबदारीने काम करू, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे स्पष्ट केले.

