महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bhalchandra Nemade: भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण; लंडनमध्ये ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’ लवकरच

मुंबई : ‘कोसला’कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

याचप्रमाणे, चौथे विश्व मराठी संमेलन हे २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत नाशिक येथे भरगच्च रसिक प्रतिसादात आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

डॉ. सामंत यांनी यावेळी २०२५ सालचे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्राशी संबंधित एकूण ३५ पुरस्कारांची घोषणा केली.
यामध्ये –
• श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना श्री. पु. भागवत पुरस्कार,
• नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेला श्री. पु. भागवत पुरस्कार,
• डॉ. दिलीप धोंगडे आणि आपटे वाचन मंदिर यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार,
• विनोद नारायण कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद यांना कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार,
• तसेच २०२४ चा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, २०२५ सालचा साहित्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा लाख रुपये असे आहे.
तर कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांना देण्यात येणार असून त्याचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे.

यावर्षीपासून विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार सुरू करण्यात येत असून तो आळंदी येथील शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कूरेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूपही मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पाच लाख रुपये असे आहे.

डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपये असे आहे. नाशिक येथे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत साहित्यिक व संस्थांची निवड करण्यात आली.
२०२४ सालासाठी देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय (२२), बाल वाङ्मय (६), प्रथम प्रकाशन (६) आणि सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (१) असे एकूण ३५ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

चार दिवस चालणाऱ्या विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रक म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करताना डॉ. सामंत म्हणाले की, चौथ्या विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
यामध्ये मराठी भाषेचा संगीत क्षेत्रातील ब्रँड अ‍ॅम्बेसेडर, तसेच मराठी लेखक म्हणून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अशी नवी संकल्पनाही राबवण्यात येणार आहे.

याशिवाय, लंडन येथे पाच कोटी रुपयांची इमारत खरेदी करण्यात आली असून, तेथे पुढील दोन महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वैश्विक मराठी भाषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तंजावर येथील भोसले राजघराण्याशी तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या लाखो मराठी बांधवांशी महाराष्ट्राची नाळ अधिक घट्ट राहावी, यासाठी यंदापासून तंजावर महोत्सव सुरू करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तंजावरच्या राजघराण्याशी चर्चा करून महोत्सवाच्या तारखा जाहीर केल्या जातील, असेही डॉ. सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात