मुंबई: राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली.
राज्यातील महामार्गांवर धावणाऱ्या खासगी स्लीपर कोच बसेसच्या अपघातांबाबत सदस्य Dhananjay Munde यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सरनाईक म्हणाले की, गेल्या वर्षी झालेल्या एका भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. संबंधित बस पुणे नोंदणीची असून प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणांत पोलिस चौकशीत चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता न आल्याने जीवितहानी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
काही खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली अनधिकृत बदल करतात. पूर्वी एकच स्लीपर स्तर असायचा; आता दोन स्तर बसवले जातात. परदेशात अशा स्लीपर कोचवर बंदी असली तरी, केंद्र सरकारच्या नियमानुसार भारतात सेवा सुरू असल्याने थेट बंदी शक्य नाही. महाराष्ट्राने बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणीकृत बस येथे येऊ शकतात, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
अपघात रोखण्यासाठी राज्यभर चेकपोस्ट उभारण्यात आले असून अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विविध उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण १ टक्क्याने घटले आहे. मात्र हे समाधानकारक नसून अपघात शून्यावर आणण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
वेग नियंत्रणासाठी बसमध्ये ८० किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरीही काही बसेस १२० ते १४० किमी प्रतितास वेगाने धावत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर उपाय म्हणून ब्रेक अनालायझर (अल्कोहोल इंटरलॉक) प्रणाली बसवण्याचा विचार सुरू आहे. चालकाने दारू प्यायल्यास ही यंत्रणा बस सुरू होऊ देत नाही. या यंत्रणेची किंमत सुमारे दीड लाख रुपये असून, एसटी महामंडळाच्या नव्या बसेस तसेच टाटा आणि अशोक लेलँडकडून खरेदी होणाऱ्या बसेसमध्ये ती अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी बस चालकांनाही ही यंत्रणा बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्ते सुरक्षेसाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येत असून त्यात रिफ्लेक्टर, अॅरो मार्किंग, यु-टर्न व स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक, तसेच १००, २००, ३०० आणि ५०० मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड बसवण्याची योजना आहे. हा आराखडा राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, एसटी महामंडळाचे मार्ग आणि महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर लागू केला जाणार आहे. अंतिम टप्प्यातील या आराखड्याला लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
सांगली येथे एका बसचे चेसिस नंबर वेगवेगळ्या प्रकारे वापरल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नियमभंग, फसवणूक किंवा चुकीची वाहनचालना आढळल्यास कडक कारवाई व आवश्यक असल्यास गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या चर्चेत Jayant Patil, Bhaskar Jadhav, Aditya Thackeray, Devayani Pharande आदींनी सहभाग घेतला.
End

