महाराष्ट्र ताज्या बातम्या

जोगेश्वरी SRA प्रकल्पात अनियमिततेचा आरोप; चौकशी करून कारवाई होईल – माधुरी मिसाळ

Minister of State Madhuri Misal speaking in Maharashtra Assembly on Jogeshwari SRA project issue

मुंबई – : जोगेश्वरी (पूर्व) येथील सीटीएस क्रमांक ४५ आणि ४८ असलेल्या जमिनीवरील विकासकामासाठी बिल्डर ग्यानप्रकाश शुक्ला एलएलपी यांनी परवानगी मिळविताना अनियमितता केली असेल तर त्याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. एसआरएच्या नकाशात ९ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ६ मीटरचा रस्ता असताना अग्निशमन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत अग्निशमन विभागात परवानगी मिळवण्यासाठी लाचलुचपत होत असल्याचा आरोप केला. संबंधित विकासकाने महापालिका आयुक्तांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या, तसेच या प्रकरणाशी संबंधित एका शिपायाचा मृत्यू संशयास्पद असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.

प्रभू यांनी संतप्तपणे प्रश्न उपस्थित करत “हा विकासक कोण? सरकारचा जावई आहे का?” असा सवाल केला आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मूळ लक्षवेधी सूचना अग्निशमन विभागाच्या परवानगीसंदर्भात असली तरी सदस्यांनी मांडलेली माहिती गंभीर स्वरूपाची आहे. कोणाचीही गय न करता चौकशी करण्यात येईल आणि एक महिन्याच्या आत अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात