महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis shakes hands with Vietnam President Tô Lâm during the India-Vietnam Business Forum in Mumbai

बौद्ध वारसा पर्यटन, उद्योग, स्मार्ट सिटी आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर

मुंबई  – भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र  विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे.व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी राज्यात येण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत आणि व्हिएतनाम भागीदारी अधिक दृढ होऊन ‘एन्हान्स्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रटेजिक पार्टनरशिप’ नव्या स्तरावर नेल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा सांगताना मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारुन त्याला आधुनिक काळात मिळवून दिलेल्या अधिष्ठानाचा परिचय दिला. तसेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली अजिंठा आणि वेरुळ येथील बौद्ध आणि जैन लेणी येथे व्हिएतनामच्या गुंतवणुकदारांचे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगर आणि हो चि मिन्ह सिटी यांच्यात थेट हवाई सेवा सुरू करण्यासह स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी यावेळी मांडला.

मुंबई आणि हो चि मिन्ह मध्ये साधर्म्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या कराराचे स्वागत केले. तसेच व्हिएतनाम कंपनी विनग्रूपच्या महाराष्ट्रातील 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या प्रस्तावित गुंतवणुकीच्या कराराचे स्वागत करताना हा दक्षिण पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा करार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, गडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक संधींबद्दल माहिती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना उद्योग, ऊर्जा, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुंबई आणि पुणे येथील औषधनिर्माण क्षेत्र जागतिक दर्जाचे असून व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा विश्वासार्ह पुरवठा करण्याची क्षमता राज्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र-व्हिएतनाम व्यावसायिक परिषद दरवर्षी मुंबई आणि हो चि मिन्ह सिटी येथे आळीपाळीने आयोजित करण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी मांडला. व्हिएतनामच्या प्रतिनिधींच्या मुंबईतील पहिल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

भारत-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढे यावे – राष्ट्राध्यक्ष तो लाम

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वंकष आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उद्योग, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी या फोरममध्ये बोलताना केले.

मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्र असून येथे आयोजित हा कार्यक्रम भारत-व्हिएतनाम संबंधांना नवी दिशा देणारा असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत आर्थिक सहकार्य, जागतिकीकरणातील नव्या संधी आणि विश्वासार्ह भागीदारीचे महत्त्व अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक वाहने, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान सेवा, ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक भारतीय उद्योग व्हिएतनाममध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असून हे सहकार्य भविष्यातील व्यापार आणि उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

द्विपक्षीय सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी व्यापार सुलभीकरण, आर्थिक सहकार्य वाढविणे, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी मजबूत करणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि गुंतवणूक प्रक्रियेत अधिक सुलभता आणणे या प्रमुख बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी सांगितले. व्यापार क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनुभवांचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. भारतीय उद्योगांना व्हिएतनाममध्ये अधिक गुंतवणूक करण्याचे आणि अनुभव व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात