मुंबई ताज्या बातम्या

मिसिंग लिंक धोकादायकच; बांधकाम आणि खर्चाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा : अनंत गाडगीळ

मुंबई-पुणे मिसिंग लिंक बोगद्यात मुसळधार पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असताना दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे दृश्य.

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि प्रकल्पाच्या खर्चाची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक तसेच आर्थिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी केली आहे. अलीकडेच बोगद्यात घडलेल्या प्रकारामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागात बोगदा खोदताना त्याच्या आतील भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग केले जाते. हे लायनिंग निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीच्या पद्धतीने झाले, तर पावसाळ्यात डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्याच्या वाढत्या दाबामुळे ते निकामी ठरू शकते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमधून अशीच परिस्थिती दिसून येत असल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली.

युरोपमधील मानकांचा संदर्भ देताना गाडगीळ म्हणाले की, तेथील निकषांनुसार अशा प्रकारचे बोगदे आणि मार्ग पूर्ण झाल्यानंतर किमान १० ते १२ महिने त्यांची चाचणी केली जाते. या कालावधीत उणिवा शोधून त्यांची दुरुस्ती केल्यानंतरच असे मार्ग नागरिकांसाठी खुले केले जातात.

मात्र, युती सरकारने घाईघाईत या प्रकल्पाचे उद्घाटन केल्याने आवश्यक सुरक्षितता चाचण्या आणि सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई-पुणे मार्गावर नियमित प्रवास करणारे अनेक टॅक्सीचालक मिसिंग लिंकचा वापर करण्यास घाबरत असल्याचाही दावा त्यांनी केला.

गाडगीळ यांनी प्रकल्पाच्या अभियांत्रिकी रचनेवरही प्रश्न उपस्थित करत, सुमारे ९ ते १० किलोमीटरच्या या मार्गात अधिक नैसर्गिक उघडी जागा किंवा आपत्कालीन मार्गांचा विचार व्हायला हवा होता, असे मत व्यक्त केले.

प्रकल्पाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सांगितले की, अवघ्या ९ ते १० किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी सुमारे १२ ते १३ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. या खर्चाचा सविस्तर तपशील राज्य सरकारने जाहीर करावा, जेणेकरून जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला आहे की नाही, याची वस्तुस्थिती नागरिकांसमोर येईल.

मिसिंग लिंकमधून उद्घाटनानंतर पहिल्यांदा प्रवास केल्यानंतरच आपण मंत्रालयातील वार्ताहर कक्षातील काही पत्रकारांशी बोलताना हा प्रकल्प धोकादायक वाटत असल्याची भीती व्यक्त केली होती, असेही गाडगीळ यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर राजकीय टीकाही करत, “विकासाचे गुजरात मॉडेल नको,” असा टोला लगावला.

दरम्यान, गाडगीळ यांनी केलेल्या आरोपांवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज