महाराष्ट्र ताज्या बातम्या

आंबेत पुलाला ड्रेजरची धडक; रायगड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

रायगड-रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत पुलाला भरकटलेल्या ड्रेजर आणि बार्जची धडक लागल्यानंतरचे दृश्य.

मध्यरात्री भरतीच्या वेळी भरकटलेल्या तीन ड्रेजर आणि बार्जची पुलाच्या खांबाला धडक; नुकसानाचे चित्र ड्रेजर हटवल्यानंतर स्पष्ट होणार

महाड: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील महत्त्वाच्या आंबेत पुलाला मध्यरात्री भरतीच्या वेळी भरकटलेल्या तीन ड्रेजर आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जची जोरदार धडक बसली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळ-सापे परिसरातील खाडीत नांगरून ठेवण्यात आलेले ड्रेजर आणि वाळू वाहतूक करणारे बार्ज मुसळधार पाऊस व भरतीमुळे भरकटले. भरतीमुळे पाण्याची पातळी वाढल्याने या ड्रेजरची उंची पुलाच्या खांबांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी पुलाच्या कॉलमला धडक दिली. माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार लुंगे यांनी सांगितले की, सध्या ड्रेजर आणि बार्ज पुलाला अडकून बसले आहेत. गॅस कटिंगच्या साहाय्याने त्यांना हटविण्याचे काम सुरू आहे. हे हटवल्यानंतरच पुलाच्या संरचनेचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे मूल्यांकन करता येईल. सध्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून परिस्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना

सावित्री नदीवरील आंबेत पुलाचे उद्घाटन १६ फेब्रुवारी १९७८ रोजी करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वीही एका ड्रेजरने पुलाला धडक दिल्याने दोन खांबांचे नुकसान झाले होते. त्यानंतर हा पूल सुमारे दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर २७ जून २०२१ रोजी तत्कालीन राज्यमंत्री आदिती तटकरे आणि तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते पुलाचे पुन्हा लोकार्पण करण्यात आले होते. मात्र अवघ्या पाच वर्षांतच या पुलाला पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे.

गुन्हा दाखल होणार का?

या घटनेनंतर वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज आणि ड्रेजरच्या मालकांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही अशाच घटनांमुळे पुलाचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाकडून केवळ औपचारिक कारवाई होणार की संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जर पुलाचे मोठे संरचनात्मक नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले, तर रायगड-रत्नागिरीला जोडणारा हा महत्त्वाचा दळणवळण मार्ग दीर्घकाळ बंद राहण्याची शक्यता आहे. त्याचा फटका हजारो नागरिक, व्यापारी आणि वाहतूकदारांना बसू शकतो.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात