मुख्य बाजारपेठ जलमय; साहिलनगरमध्ये घर कोसळले, केंबुर्लीजवळ पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली
महाड: सावित्री, गांधारी, काळ आणि अन्य उपनद्यांमधील गाळ काढण्याचे काम करूनही यंदाच्या अतिवृष्टीत महाड शहराला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर महाड शहरात रविवारी रात्रीपासून पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळी पाणी ओसरू लागले असतानाच पुन्हा नदीची पातळी वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाबरोबरच महाबळेश्वर परिसरातील पावसामुळे सावित्री नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रानबाजिरे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे. परिणामी महाड तालुक्यातील अनेक मार्ग बंद ठेवावे लागले आहेत.

महाड तालुक्यात ६ जुलै रोजी २६० मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये ५ जुलै रोजी ११३.९ मिमी तर ६ जुलै रोजी ९८.१ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. महाड शहराजवळील दादली आणि गांधारी पुलांवरून पाणी वाहू लागल्याने हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. स्थानिक आपदा मित्र आणि शासकीय कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले असून नागरिकांना पुलांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
साहिलनगरमध्ये घर कोसळले; तिघे जखमी

मुसळधार पावसामुळे साहिलनगर परिसरातील यास्मिन मुबीन फटकुरे यांच्या मालकीचे घर रविवारी रात्री कोसळले. या दुर्घटनेत यास्मिन मुबीन फटकुरे, मुबीन फटकुरे आणि मुमताज हसन शेख हे किरकोळ जखमी झाले. घर कोसळल्यामुळे शेजारील हसन अब्बास शेख आणि नजीर अब्बास शेख यांच्या घरांचेही नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना बाहेर काढले.
केंबुर्लीजवळ पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली

मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ साचलेल्या पाण्यातून जात असताना मुंबईहून महाडकडे येणारी एसटी बस दगडात अडकली. बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एसटी वाहतूक विस्कळीत

अतिवृष्टीमुळे महाड एसटी आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते बंद असल्याने महाड आगारातून सुटणाऱ्या बहुतांश बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ पोलादपूरकडे जाणाऱ्या चार बस सुरू असून उर्वरित सुमारे ३४९ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिली.
गाळ काढूनही पूर का?

यंदा सावित्री, गांधारी, काळ आणि इतर उपनद्यांमधील गाळ काढण्याची कामे करण्यात आली होती. त्यामुळे पूरस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा होती. मात्र यंदाच्या विक्रमी पावसामुळे पुन्हा एकदा महाड शहराला पुराचा सामना करावा लागला आहे. पूरस्थितीला केवळ गाळ साचणे कारणीभूत आहे की विक्रमी पर्जन्यमान, धरणांचा विसर्ग, नदीपात्राची क्षमता किंवा इतर भौगोलिक कारणेही जबाबदार आहेत, याचा सविस्तर अभ्यास आवश्यक असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

