पूरस्थिती, दरडी आणि बंद रस्त्यांमुळे ३०० हून अधिक एसटी फेऱ्या रद्द; प्रवाशांचे मोठे हाल
महाड: कोकणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महाड एसटी आगारालाही बसला आहे. अतिवृष्टीमुळे महाड आगारातून ग्रामीण भागात तसेच लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणारी एसटी बससेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ या प्रमुख नद्यांसह उपनद्यांना पूर आला आहे. महाबळेश्वर परिसरातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढला असून महाड शहर व परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते जलमय झाले असून एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.
महाड आगार हे कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती आगार आहे. येथून महाड व पोलादपूर तालुक्यांसह मुंबई, ठाणे, पुणे, बोरिवली, नाशिक, जळगाव, अक्कलकोट आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या बससेवा चालवल्या जातात. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणेजवळील सुकेळी खिंड, माणगाव-ताम्हणे घाट, महाड-पोलादपूर आंबेनळी घाट तसेच खेडजवळील खवटी परिसरात दरडी कोसळल्याने या मार्गांवरील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम झाला नसला, तरी कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, पोलादपूर बसस्थानकातून तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी सेवा सध्या सुरू आहे. मात्र हा भाग दुर्गम व डोंगराळ असल्याने तेथेही अतिवृष्टी सुरू असून, दरडी कोसळल्यास ही सेवा देखील बंद करण्याची वेळ येऊ शकते.
महाड आगारातून दररोज ग्रामीण, मध्यम आणि लांब पल्ल्याच्या मिळून ३४९ एसटी फेऱ्या चालवल्या जातात. त्यापैकी सुमारे ३०० फेऱ्या पूरस्थिती, बंद रस्ते आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती महाड आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांनी दिली.

