ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हॉटेल्स, उपाहारगृहे आणि बारमध्ये चालणाऱ्या अश्लील नृत्यांवरही पोलिसांना कारवाई करता यावी, यासाठीचे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले.
मुंबई : हॉटेल्स, उपहारगृहे आणि बारमध्ये महिलांच्या अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालणारे महत्त्वाचे सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झाले.
‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०२६’ हे विधेयक गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत मांडले. त्यानंतर पीठासीन अधिकारी समीर कुणावार यांनी हे विधेयक संमत झाल्याचे घोषित केले.
यापूर्वी २०१६ मध्ये डान्स बारमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी मूळ विधेयक आणण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रत्यक्ष संगीत सादरीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या ऑर्केस्ट्रा परवान्याचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. संगीत सादरीकरणाच्या नावाखाली काही हॉटेल्स, उपहारगृहे आणि बारमध्ये अश्लील नृत्ये सादर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर आता संगीत सादरीकरणालाही म्हणजेच ऑर्केस्ट्रालाही या सुधारित अधिनियमाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील नृत्यांवर पोलिसांना थेट कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या विधेयकावर चर्चेदरम्यान अमित साटम, सुधीर मुनगंटीवार, जितेंद्र आव्हाड, सुमित वानखेडे, संजय केळकर आदी सदस्यांनी आपली मते व्यक्त केली.

