मुंबई : महागाईच्या पार्श्वभूमीवर आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालक यांच्या रखडलेल्या मानधनवाढीचा मुद्दा बुधवारी विधान परिषदेत पुन्हा ऐरणीवर आला. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा प्रश्न उपस्थित करत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
सध्या आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना दरमहा ३० हजार रुपये, तर वाहन चालकांना २० हजार रुपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हे मानधन अपुरे ठरत असल्याने मार्च महिन्यापासून मानधनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र, प्रशासकीय त्रुटींचे कारण देत हा प्रस्ताव वारंवार परत पाठवला जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दरेकर यांनी सभागृहात नमूद केले.
राज्याच्या तिजोरीवर फारसा अतिरिक्त आर्थिक भार न पडता स्वीय सहाय्यकांचे मानधन ३० हजारांवरून ४० हजार रुपये, तर वाहन चालकांचे मानधन २० हजारांवरून ३० हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, आमदारांकडे कार्यरत असलेल्या दुसऱ्या स्वीय सहाय्यकालाही विधिमंडळाचे अधिकृत ओळखपत्र देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
या प्रस्तावातील सर्व प्रशासकीय त्रुटी तातडीने दूर करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी विनंती दरेकर यांनी संसदीय कार्यमंत्र्यांकडे केली.
भाजपच्या गटनेत्यानेच सभागृहात हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकार आता या प्रस्तावावर किती लवकर निर्णय घेते आणि अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली मानधनवाढ प्रत्यक्षात कधी लागू होते, याकडे स्वीय सहाय्यक, वाहन चालक आणि विधिमंडळातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

