महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रतापगड पायथ्याशी वीर जीवा महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यासाठी एक कोटींचा निधी

विधानसभेत निवेदन करताना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. प्रतापगड पायथ्याशी वीर जीवा महाले यांचे स्मारक उभारण्याची घोषणा त्यांनी केली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जीवा महाले यांच्या स्मरणार्थ प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. पर्यटन विभागाच्या जागेत हे स्मारक उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

स्वराज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिलशाही सेनापती अफझलखानाची छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रतापगडावर ऐतिहासिक भेट झाली होती. त्या प्रसंगी अफझलखानाचा विश्वासू शरीररक्षक सय्यद बंडा याने शिवाजी महाराजांवर जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी वीर जीवा महाले यांनी पुढे येत छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले. त्यांच्या या पराक्रमाची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीर जीवा महाले स्मारकाच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. या स्मारकामुळे प्रतापगड परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनदृष्ट्या महत्त्व आणखी वाढेल.

१० नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवप्रेमी प्रतापगडावर येतात. वीर जीवा महाले यांच्या स्मारकामुळे त्यांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे देसाई म्हणाले.

शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांकडून वीर जीवा महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याने या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात