संहिता राजन यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य, सचिन शिंदे यांना नाट्यसेवा, तर मालती इनामदार यांना कलागौरव पुरस्कार
प्रवरा परिवारातर्फे ३६ व्या वर्षाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा; मराठी अभ्यास परिषदेला प्रबोधन पुरस्कार
मुंबई: सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना, ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ संहिता राजन यांना, ‘राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार’ सचिन शिंदे यांना, तर ‘राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार’ मालती इनामदार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त साहित्य, कला, नाट्य आणि प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम प्रवरा परिवाराने सुरू केला आहे. या पुरस्कार उपक्रमाचे हे ३६ वे वर्ष आहे.
गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवरानगर येथे राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार निवड समितीत अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासह डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंगडे आणि प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पाहिले.
यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रकार ते साहित्यिक असा यशस्वी प्रवास करताना समाजातील शोषित आणि वंचित घटकांचे दुःख समजून घेत, पत्रकारितेत प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव साहित्याच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ पुणे येथील संहिता राजन यांच्या ‘चल गं सये वारुळाला’ या कथासंग्रहाला दिला जाणार आहे. ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या संहिता राजन या आघाडीच्या तरुण लेखिका असून, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्त्री संगणक अभियंत्यांच्या अस्तित्वाभोवती निर्माण झालेल्या नव्या वास्तवाचे चित्र त्यांनी आपल्या कथांमधून प्रभावीपणे मांडले आहे.
मानवी व्यवहार, जीवनातील नातेसंबंध, कौटुंबिक संरचना आणि भवतालच्या समाजव्यवहारातील सूक्ष्म अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या सुरेंद्र दरेकर यांच्या ‘समर ऑफ सेवंटी नाईन’ या कादंबरीला ‘राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाट्यप्रयोगांपासून प्रायोगिक नाटकांपर्यंत सातत्याने कार्यरत राहून ‘नाट्यचौफुला’ अंतर्गत सलग चार नाट्यप्रयोगांचे महाराष्ट्रभर प्रयोग करणारे तसेच एकूण ३५ नाटके आणि ५० हून अधिक एकांकिकांचे दिग्दर्शन करणारे सचिन शिंदे यांना यंदाचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
आपल्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांच्याकडून नृत्य आणि संगीताचे धडे घेत तमाशा कलेची परंपरा पुढे नेणाऱ्या मालती इनामदार यांना ‘राज्यस्तरीय कलागौरव तमाशा कलावंत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठी भाषेच्या हितासाठी आणि समृद्धीसाठी कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद आदी विविध उपक्रम राबवून मराठी भाषेसाठी समर्पित भावनेने काम करणारी संस्था म्हणून मराठी अभ्यास परिषदेची ओळख आहे. या संस्थेला यावर्षी ‘राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्कार’ देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सामान्य कुटुंबातून आणि खेड्यातून आलेल्या तरुणाला नोकरी मिळाल्यानंतरही घर, कुटुंब, गाव आणि नातेसंबंध सांभाळताना येणारे अनुभव आणि त्यातून होणारी मनाची घालमेल यांचे जिवंत चित्रण ‘खटपट’ या आत्मचरित्रातून करणारे निवृत्ती जोरी यांना यंदाचा ‘अहिल्यानगर जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. १० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच, संवेदनशील व्यक्ती म्हणून आपल्या भवतालच्या माणसांमधून आणि त्यांच्याशी निर्माण होणाऱ्या संबंधांतून शांतीचा शोध आणि बोध घेण्याचा अनुभव मांडणाऱ्या डॉ. संजय गोर्डे यांच्या ‘शांतीच्या शोधात’ या पुस्तकाला ‘उत्तेजनार्थ साहित्य पुरस्कार’ देण्यात येणार आहे. पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

