महाराष्ट्र ताज्या बातम्या

२१ ऑगस्टला राज्यभर ‘वॉक फॉर वॉटर’; प्रत्येक जिल्ह्यात महा वॉकेथॉन : मंत्री संजय राठोड  

महाराष्ट्रात 21 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ जलसंधारण उपक्रमाचे प्रतीकात्मक दृश्य

जलसंधारण दिनानिमित्त उपक्रम  

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त महाराष्ट्राच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची थीम असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून, त्यानंतर सहभागींना मृद व जलसंधारणाची शपथ दिली जाणार आहे.

जलसंधारणासाठी राज्यव्यापी अभियान

राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत असल्याचे राठोड यांनी सांगितले. मृद व जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईत राज्यस्तरीय कार्यक्रम

महा वॉकेथॉनचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईत होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, खेळाडू, विद्यार्थी तसेच एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस आणि होमगार्डचे सदस्य सहभागी होणार आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, रनिंग आणि सायकलिंग क्लब, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार, क्रीडा संघटना, व्यायामशाळा आणि महिला संघटनांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

QR कोडद्वारे नोंदणी; सहभागींना ई-प्रमाणपत्र

महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी QR कोड आधारित ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम दहा विजेत्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात ₹७१ हजारांची प्रस्तावित बक्षिसे

प्रायोजकांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एकूण ₹७१ हजारांची रोख बक्षिसे देण्याचा प्रस्ताव आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹२५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१० हजारांचे बक्षीस व गौरवचिन्ह देण्यात येईल. याशिवाय प्रत्यक्ष सहभागींपैकी सोडतीद्वारे निवडलेल्या सात जणांना प्रत्येकी ₹३ हजारांचे विशेष बक्षीस देण्याचे प्रस्तावित आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियावर #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात