महाराष्ट्र ताज्या बातम्या

पावसाच्या खंडानंतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; महाडची भातशेती दुहेरी संकटात

महाड तालुक्यात भातशेतीजवळ वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी उभारलेले मचाण

करपा रोगाने आधीच नुकसान; रानडुक्कर आणि रानगव्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मचाणावर रात्र जागून काढावी लागते

महाड : पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे आधीच संकटात आलेल्या महाड तालुक्यातील भातशेतीसमोर आता वन्यप्राण्यांचा नवा धोका उभा राहिला आहे. दाणा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस कमी झाल्याने काही भागांत भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यातच रानडुक्कर आणि रानगवे रात्रीच्या वेळी शेतात घुसून उभ्या पिकाचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

महाड तालुक्यात हंगामात एकूण पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी भातपिकाला पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या टप्प्यावर सप्टेंबरपासून पावसाचा खंड पडल्याचे शेतकरी सांगतात. काही ठिकाणी शेतजमीन कोरडी पडून तडे गेल्याचेही दिसत असून, उरलेल्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रात्रभर मचाणावर पहारा

पावसाच्या संकटातून वाचलेले पीक आता वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतातच मुक्काम करावा लागत आहे. रानडुक्कर आणि रानगवे रात्रीच्या वेळी उभ्या भातपिकात घुसून पीक तुडवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतालगत मचाण बांधून डबे वाजवणे, फटाके फोडणे किंवा भोंग्यांद्वारे आवाज करून वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महाड–विन्हेरे मार्गावरील तांबडी कोंड परिसरात तांबडे नावाच्या शेतकऱ्याने आपल्या शेतालगत मचाण उभारून रात्री उभ्या पिकाचे संरक्षण करण्याची वेळ आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पाण्याच्या शोधात रानगवे वस्तीकडे?

फौजी आंबवडे परिसरातील खिंडवाडी धरणाजवळील जंगल भागातही रानगव्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे कमी झाल्यामुळे रानगवे पाण्याच्या शोधात मानवी वस्ती आणि शेतीकडे येत असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या या हालचालींचे नेमके कारण वनविभागाच्या पाहणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. रानगवे उभ्या पिकातून जाताना मोठ्या प्रमाणावर पीक तुडवले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांना रात्री वारंवार शेतात धाव घ्यावी लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

महाड तालुक्यातील भातशेती. पावसाच्या खंडामुळे आणि वन्यप्राण्यांच्या वावरामुळे यंदाच्या पिकावर दुहेरी संकट निर्माण झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

बिबट्यांच्या दर्शनामुळेही भीती

काही गावांच्या परिसरात बिबट्यांचे दर्शन होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे केवळ पिकांचे नुकसानच नव्हे, तर रात्री शेताची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जंगल परिसरात पुरेसे पाणवठे निर्माण करणे, वन्यप्राण्यांच्या हालचालींचे निरीक्षण करणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

पंचनामे आणि प्रतिबंधात्मक उपायांची मागणी

शेतकऱ्यांच्या मते, पावसाचा खंड, पिकावरील रोग आणि वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान या तिहेरी संकटामुळे यंदाच्या भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी आणि वन विभागाने संयुक्त पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करावेत, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात आणि जंगल परिसरात आवश्यक ठिकाणी पाणवठे निर्माण करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात