मुंबई
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात जन्माला आल्या, म्हणून निलम गोऱ्हे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती होऊ शकल्या, अशी भावपूर्ण कृतज्ञता उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केली.
विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी समारंभात विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहात त्या बोलत होत्या. विधीमंडळात अनेक महत्त्वपूर्ण कायदे संमत होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान येथील आज येथे सभागृहात उपस्थित असलेल्या अनेक आजी – माजी सदस्यांचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उपसभापती गोऱ्हे यांनी यावेळी प्रत्येक सदस्यांचा नामोल्लेख केला. त्यावेळी उपस्थितांनी बाके वाजवून या सदस्यांना एकप्रकारे मानवंदना दिली.
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी ऐतिहासिक रोजगार हमी कायद्यासह विधानपरिषद सभागृहात संमत झालेल्या अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांचा उल्लेख केला. घरेलु कामगार संरक्षण कायदा नागपूर हिवाळी अधिवेशनात पहाटे एक वाजता संमत झाला, अशी आठवण त्यांनी सांगितली. विधिमंडळ अधिवेशनात एकाच वेळी दोन्ही सभागृहे सुरू असतात. त्यामुळे कामकाजाच्या सोयीसाठी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संवादासाठी हॉटलाईन असावी, अशी सुचना त्यांनी दिली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी विधानपरिषद आणि विधानसभा ही दोन सभागृहे एकाच रथाची दोन चाके आहेत असे सांगून लोकशाहीची गौरवशाली परंपरा कायम रहावी, कामकाज प्रभावी व्हावे, यासाठी द्विसदनपद्धती कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांचा आपण सन्मान राखतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी दोन्ही साधने आवश्यक आहेत असे मात व्यक्त केले. आक्रमकता आणि सकारात्मकता यांचा संगम हवा. लोकशाहीत मैत्री भावना संवाद महत्त्वाचा आहे, संवाद थांबला तर लोकशाही थांबेल, असेही गुजराथी म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी विधानपरिषद सभागृहाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, यांचेही भाषण झाले. विधिमंडळ जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी सूत्रसंचालन केले.