ताज्या बातम्या महाराष्ट्र

कृषिमंत्र्यांची सहृदयता….. अन् १९ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती…..!

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

त्या १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक (Krishi Sevak) पदाची परीक्षा दिली. परंतु परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया यावर कोरोनाचे सावट पडले. नेमके याच दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त झाल्याने या मुलांच्या करिअरवर काळे सावट पडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या मानवतावादी निर्णयामुळे या १९ तरुणांच्या करिअरला पुन्हा नवे वळण मिळाले आहे. या तरुणांना अखेर शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ३१३ कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये राज्यभरातून सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या व २०२० मध्ये निकाल जाहीर करण्यात आला.

निकालात उत्तीर्ण उमेदवारांनी काही कारणामुळे नियुक्ती स्वीकारली नाही किंवा विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. अशा १९ उमेदवारांना कृषी सेवक पदी नियुक्तीची संधी मिळाली. परंतु, याच दरम्यान कोरोनाचे संकट आल्यामुळे जग ठप्प झाले. २०२० ते २१ या कालावधीत कोरोनामुळे (corona pandemic) कृषी सेवक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम सुद्धा रखडले.

निकालाच्या दिनांकापासून एक वर्षात नियुक्ती देणे बंधनकारक होते. मात्र कोरोना महामारीमुळे नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास उशीर झाल्याने निवड सूची वैधता कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे या १९ तरुणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यावर न्यायाधिकरणाने संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा असे आदेश २०२१ च्या अखेरीला दिले. त्यानुसार या १९ तरुणांनी नियुक्तीच्या निर्णयासाठी शासनाचे दार ठोठावले.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी १५ जुलै २०२३ रोजी पदभार स्वीकारल्या बरोबर ताबडतोब या मुलांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर या तरुणांना कृषी सेवक पदावर नियुक्ती देण्यात आली. याबद्दल या तरुणांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात