जालना
गेल्या दोन दिवसात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १६ दिवसांपासून जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जीवे मारण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे पाटील काल मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यास निघालेही होते. मात्र त्यांनी निर्णय बदलला आणि आज सकाळी ते पुन्हा आंतरवाली सराटीत दाखल झाले.
या घडामोडींनंतर आज सोमवारी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदे घेत उपोषण स्थगित करीत असल्याचं जाहीर केलं. मात्र साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसात चर्चा करुन पुढची दिशा ठरवणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. उपोषण मागे घेतानाही जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘राज्यात पुन्हा एकदा दंगल झालं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं. राज्य बेचिराख झालं असतं. पण आम्ही घडू दिलं नाही. तुम्ही बंगल्यात लपून बसला असता पण राज्य जळालं असतं’, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
अंबडमध्ये संचारबंदीचे आदेश
रविवारी ते आक्रमक झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर थेट मुंबईच्या दिशेने निघाले होते. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.