X: @therajkaran
पाकिस्तानच्या राजकारणावर इस्लामी पक्षांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. हे इस्लामी पक्ष (Islamic political parties) म्हणजे इस्लाममधील तत्वांना अनुसरून चालणारे पक्ष होत. ते मुख्य प्रवाहात नाहीत. मात्र, त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (General elections in Pakistan) इस्लामी पक्षांना दारूण पराभव सहन करावा लागला. हे चांगले झाले की वाईट यावर आता पाकिस्तानात विचार मंथन सुरू झाले आहे.
पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे (Election Commission of Pakistan) 167 पक्षांची नोंद आहे. त्यातील 25 पक्ष हे इस्लामी आहेत. म्हणजेच इस्लाममधील कोणत्या ना कोणत्या घटकासाठी ते काम करीत असतात. जमात-ए-इस्लामी (Jamaat-e-Islami), तेहरीक-ए- लबाईक -पाकिस्तान (Tehreek-e Labbaik-Pakistan), मजलिस-वाहदात-ए-मुस्लिमीन (Majlis Wahdat-e-Muslimeen), पाकिस्तान मरकाझी मुस्लिम लीग (Pakistan Markazi Muslim League) आणि जमात-ए-उलेमा इस्लाम नजरियाती (Jamait Ulema-e-Islam Nazryati) हे त्यांपैकी काही प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांची निवडणुकीतील कामगिरी यथातथाच होती. मात्र, जनमानसावरील त्यांचा प्रभाव टिकून आहे.
जमात-ए-इस्लामी बऱ्यापैकी सर्वसमावेशक आहे. मात्र, जेयुआय (एफ) आणि टीएलपी यांचा सगळा भर अनुक्रमे देवबंदी आणि बरेलवी सुन्नी (Sunni Islam) या घटकांवरच आहे. एमडब्ल्यूएम हा पक्ष शिया समुदायाचे (Shia community) प्रतिनिधित्व करतो. अशाप्रकारे मर्यादित समाज घटकांवरच लक्ष केंद्रित केल्यामुळे इस्लामी पक्षांची व्होट बँक (Vote Bank) निर्माण झाली नाही.
पाकिस्तानमध्ये चार प्रांत आहेत. पंजाब (Punjab), सिंध (Sindh), खैबर पखतुंख्वा (Khyber Pakhtunkhwa) आणि बलुचिस्तान (Balochistan). पाकिस्तानची सुमारे 75 टक्के लोकसंख्या पंजाब आणि सिंध प्रांतात राहते. या दोन्ही प्रांतांमध्ये इस्लामी पक्षांचे फारसे अस्तित्व नाही. खैबर पखतुंख्वा आणि बलुचिस्तान या प्रांतांमध्ये इस्लामिक पक्षांनी यापूर्वी सहा वेळा सत्ता हस्तगत केली आहे. यंदाची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. टीएलपी (TLP) या पक्षाने पंजाब आणि सिंधमध्ये हात-पाय पसरलेले दिसतात. हेच काय ते या निवडणुकीचे त्यांच्या दृष्टीने फलित आहे.
गॅलप पाकिस्तान (Gallup Pakistan) या संस्थेच्या अहवालानुसार इस्लामी पक्षांना या निवडणुकीत 22 टक्के मते मिळाली. तेहरीक-ए-इंसाफ पाकिस्तान समर्थित अपक्ष, पाकिस्तान मुस्लिम लीग -नवाज (Pakistan Muslim League – N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People’s Party – PPP) यांच्या खालोखाल टीएलपी हा चौथा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. इस्लामी पक्षांना सरासरी पाच टक्के मते मिळाली आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी समाधानकारक वाटते. मात्र, मिळालेल्या मतांचे जागा जिंकण्यात रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले आहे. नवे मतदार जोडण्यात आलेले अपयश हे त्याचे प्रमुख कारण आहे.
इस्लामी पक्षांची पीछेहाट होण्यामागे इम्रान खान (Imran Khan) यांच्या तेहरीक-ए-इंसाफ पाकिस्तान (Pakistan Tehreek-e-Insaf) या पक्षाने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली आहे. इम्रान खान यांचा पक्ष वरकरणी उदारमतवादी वाटतो. मात्र, आतून ते आणि त्यांचे समर्थक इस्लामी मूल्यांची जोपासना करताना दिसतात. इम्रान यांनी पाकिस्तानला ‘मदिना स्टेट’ करण्याचे जाहीर करून इस्लामी पक्षांची कोंडी केली होती. ‘मदिना स्टेट’ (Medina State) म्हणजे इस्लामी मूल्यानुसार (Islamic ideology) चालणारे राज्य असा अर्थ होतो. मतदारांना इम्रान खान यांच्या रूपाने नवा हिरो मिळाल्यामुळे स्वाभाविकपणाने त्यांनी इस्लामी पक्षांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
इस्लामी पक्षांनी भौतिक विकासाकडेपण लक्ष द्यावे, अशी पाकिस्तानातील तज्ञांची अपेक्षा आहे. केवळ धार्मिक चालीरीतींमध्ये गुंतून न पडता सर्वांगीण विकास (Comprehensive development) करण्यावर इस्लामी पक्षांनी भर दिला, तर भविष्यात त्यांना ‘अच्छे दिन’ येऊ शकतील, असे या तज्ञांना वाटते.