X: @therajkaran
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आज भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर आता पक्ष मोठी जबाबदारी देऊन त्या पक्षाच्या स्टार प्रचारक असू शकतील असं म्हटलं जातं आहे.
भाजपमधील प्रवेशानंतर पौडवाल म्हणाल्या, “मी सनातनशी (धर्म) घट्ट संबंध असलेल्या सरकारमध्ये सामील होत आहे याचा मला आनंद आहे. आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे हे माझे भाग्य आहे. मी स्वतः अध्यात्मात गेल्या 35 वर्षांपासून आहे. आज देश जिथे आहे तो सनातन धर्मियांसाठी खूप मोठा टप्पा आहे, खूप वर्षांनी इतका मोठा टप्पा आलाय. त्याची आपण प्रशंसा करायला हवी,” असेही त्या पुढे म्हणाल्या. लोकसभेची निवडणूक लढवणार का असे विचारला असता, “मला अद्याप माहिती नाही, ते जो काही सल्ला देतील त्यानुसार बघू” असेही त्यांनी म्हटले आहे.
दिनांक 27 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबईत जन्मलेल्या अनुराधा यांनी 1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया भादूरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अभिमान’ या चित्रपटातून गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पाच दशकांच्या कारकिर्दीत, अनुराधा पौडवाल यांनी गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलुगू, उडिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिली भाषांमध्ये 9,000 हून अधिक गाणी आणि 1,500 हून अधिक भजने गायली आहेत. ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘बेटा’ या चित्रपटांसाठी अनुराधा पौडवाल यांना फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Awards) सन्मानित करण्यात आले आहे.