X : @milindmanne70
महाड
“शासन आपल्या दारी” हा महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात व वाजतगाजत साजरा होत आहे. मात्र, दुसरीकडे महाड तालुक्यातील एका अंध व्यक्तीची धर्मपत्नी तिचा पती अंध असल्याचा दाखला मिळण्यासाठी शासन दरबारी वणवण भटकत आहे. प्रशासकीय अधिकारी मात्र त्या महिलेला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे या महिलेने दिलेल्या एका बोलक्या प्रतिक्रियेवरून पुढे आले आहे.
शासनातील सर्व खात्याचे अधिकारी एका व्यासपीठावर बोलवून शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती सरकारचा “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन राज्यभर चालू आहे. त्याच पद्धतीने रायगड जिल्ह्यातील हा कार्यक्रम माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ येणार असून रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातून एक लाख नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून एस.टी. महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली असून गाव पातळीवरील शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबाबत तलाठी मंडळ अधिकारी व सरपंच यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे. शासन आपल्या दारी या माध्यमातून नागरिकांना सर्व प्रकारच्या दाखल्यांचे या ठिकाणी वाटप केले जाणार आहे. मात्र याला अपवाद आहेत महाड तालुक्यातील ७५ वर्ष वयाचे नामदेव भिकू पवार. राहणार माझेरी गावातील (मागचे आवाढ), तालुका महाड, जिल्हा रायगड येथील ही व्यक्ती असून ही व्यक्ती मागील तीस वर्षापासून अंध आहे.
या व्यक्तीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नसून अंध असल्याचा पुरावा म्हणून शासन दरबारी दाखला मिळण्यासाठी त्यांची पत्नी वैजंता नामदेव पवार ही शासनाच्या दारोदार भटकत आहे. मात्र सरकारी अधिकारी तिला कोणत्याही प्रकारचे ठोस मार्गदर्शन न करता एका दाखल्यासाठी महाड ते माझेरी हा २० किलोमीटरचा प्रवास तिला वारंवार करावा लावत आहेत. या कटकटीला कंटाळून अखेर “आता मला दाखला नको” अशी खंत या अंध व्यक्तीच्या वृद्ध पत्नीने बोलून दाखवली.
“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून महायुती सरकार लाखो रुपयांची उधळपट्टी करीत असताना दुसरीकडे एका अंध व्यक्तीला अंध असल्याचा दाखला मिळवण्यासाठी माझेरी ते महाड, महाड ते माणगाव, आणि महाड ते अलिबाग असे वणवण भटकावे लागत आहे. अजून मी शासन दरबारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या किती पायऱ्या झीझवाव्या, अशी खंत व्यक्त करून आमची गाथा सांगावी याचा मला अक्षरश: विट आला असून आता मला दाखला नाही मिळाला तरी चालेल, परंतु मी आता माझी भटकंती थांबवीन, अशा स्पष्ट शब्दात वैजंता नामदेव पवार यांनी शासनाच्या धोरणाबद्दल नापसंती व्यक्त केली.
माझेरी येथील नामदेव भिकू पवार यांना गेली अनेक वर्षापासून अंधत्व आले आहे. त्यांच्याकडे शासनाचा जुना अपंगत्व दाखला आहे. गेल्या दोन वर्षापासून हा दाखला डिजिटल स्वरूपात दिला जात आहे. शिवाय अन्य सुविधांसाठी देखील स्वतंत्र कार्ड दिले जात आहे. या प्रत्येक दाखल्याकरिता, कार्ड करिता अनेक दाखले जोडावे लागत आहेत. हे दाखले गोळा करताना दिव्यांग व्यक्तींचे नाकीनऊ येत आहेत. आधीच दिव्यांग असल्याने त्यांना शासकीय दरबारी फेऱ्या माराव्या लागत आहेत. या विविध दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी आदी यंत्रणांनी सहकार्य केले पाहिजे, अशी माफक अपेक्षा दिव्यांग व्यक्तींनी केली आहे.