X: @therajkaran
मुंबई: उल्हासनगरमधील ज्येष्ठ नेते, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने उद्धव ठाकरे शिवसेना गटाला जबर धक्का बसला आहे. चंद्रकांत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटाचे दुसरे ज्येष्ठ नेते धनंजय बोडारे यांचे बंधू आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत बोडारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी देखील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आहेत. यावेळी मंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के, ज्येष्ठ नेते गोपाळराव लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेतील महाफुटीनंतर राज्यातील अनेक मान्यवर आणि दिग्गज नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आले. उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी यांनी देखील सुरवातीला टाळाटाळ करून अखेर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होताच. मात्र धनंजय व चंद्रकांत या बोडारे बंधूंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नकार दिला होता. अखेर चंद्रकांत यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. लवकरच त्यांचे बंधू धनंजय आबा देखील एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.