X : @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा -विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण, तसेच घरोघरी सर्वेक्षण मोहीमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, ऑक्टोबर २०२३ च्या प्रारुप मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २० लाख २१ हजार ३५० वगळली. अंतिम मतदार यादीत ४ लाख १२ हजार ४१६ मतदार वाढ झाली. एकूण मतदार यादीत ९ कोटी बारा लाख ४४ हजार ६७९ इतकी झाली असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ वयोगटात ६ लाख ७० हजार ३०२ मतदारांची भर पडली. तर २० ते २९ वयोगटात ८ लाख ३३ हजार ४९६ मतदारांची वाढ झाली. यादीतून ११ लाख ६० हजार ६९६ ह्यात नसल्याने त्यांची नावे यादी मतदार यादीतून वगळण्यात आली. मतदार यादीत ९ लाख ५ हजार ५५९ एकसारखे फोटो असलेले आढळून आले. सखोल तपासणी अंती त्यातील २ लाख ८४ हजार ६२० नावे कमी केली. काही तपशील समान असे २ लाख ५४ हजार ४६० मतदार आढळले. त्यातील ७४ हजार ४२६ नावे कमी केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदानकेंद्रे तळमजल्यावर असतील. ऊसतोड कामगार जे कामासाठी अन्य जिल्ह्यांत असतात, त्यांना मतदानासाठी सुट्टी द्यावी, यासाठी प्रयत्न करु, असे उत्तर राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी एका प्रश्नाला दिले. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे, यानिमित्ताने २४ व २५ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पुरस्कार व पारितोषिक वितरण सोहळा, तर दुसऱ्या दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार जागृती गीताचे लोकार्पण केले जाणार आहे, अशीही माहिती देशपांडे यांनी दिली.