महाराष्ट्र ताज्या बातम्या

रामभक्तांच्या सोहळ्यात अशोक चव्हाण यांची गुगली

By Abhaykumar Dandge

X: @therajkaran

नांदेड: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरात मोठे बॅनर लावून राम भक्तांना शुभेच्छा दिल्या. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात राम भक्तांना शुभेच्छा देऊन अशोक चव्हाण यांनी एक राजकीय गुगली टाकली. एकीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला जाण्याचे टाळलेले असताना माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरात लावलेल्या बॅनरमुळे हा पक्षश्रेष्ठींचा अवमान की पुन्हा भाजप प्रवेशाच्या चर्चेला तोंड फोडणे होय, अशी चर्चा राजकीय विश्लेषक मराठवाड्यात करत आहेत.

अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. हा सोहळा न भूतो न भविष्यती असा झाला. संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरणात होते. तर मराठवाड्यातही अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. सर्वत्र जल्लोष, मंत्रोच्चार, ढोल ताशा, भक्तिमय रांगोळी तसेच कारसेवकांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले. भाजपच्यावतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यानिमित्ताने एक आगळीवेगळी दिवाळी साजरी झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात साजरी झालेली ही पहिली दिवाळी होय. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुनश्च पंतप्रधानपदी निवड व्हावी, असे साकडे राम भक्तांनी घातले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅट्रिकही लवकरच होईल हे कालच्या मराठवाड्यातील गजबजलेल्या वातावरणातून स्पष्ट झाले. मराठवाड्यात पुन्हा एकदा मोदींची जादू दिसणार असल्याचे संकेत काही दिवसापासून प्राप्त झाले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होऊन पंतप्रधान होतील, यामध्ये रामभक्तांना तीळ मात्र शंका नाही. मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर मराठवाड्यात दुसरी दिवाळी साजरी होणार आहे, हे मात्र नक्की. तसेच झाले तर मराठवाड्यात ऊरलीसुरली काँग्रेसही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भविष्यात भाजपशी वैर नको म्हणून की काय अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये लावलेल्या रामभक्तांच्या शुभेच्छांच्या बॅनरमुळे एका वेगळ्या राजकीय चर्चेला पुन्हा तोंड फोडले आहे.

भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्यात आले. श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मराठवाड्यातील विविध राम मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे रात्रभर मराठवाड्यातील मंदिर परिसर चमचमत होता. संपूर्ण महाराष्ट्रातील सोहळा लक्षात घेता मराठवाड्यात झालेला अभूतपूर्व सोहळा हा इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद करण्याजोगा झाला. रविवारी मध्यरात्री बारा वाजता सर्वच ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहाटे अडीच वाजता मंदिरांमध्ये मंत्रोच्चार सुरू झाला. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

मराठवाड्यातील ग्रामीण भागात महिलांनी अंगणात सडा टाकून मोठी रांगोळी काढून अक्षरशः दिवाळी साजरी केली. ग्रामीण भागातील हनुमान मंदिरात संत महंतांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर ठीकठिकाणी महापंगतही पार पडली. ‘मेरे घर राम आये है…’ या गीतावर मराठवाड्यातील लाखो रामभक्तांनी एकच जल्लोष करत थिरकले. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने मराठवाड्यात भक्तीचा महापूर ओसंडला होता. हे सर्व चित्र भविष्यात येणारी लोकसभा केवळ भाजपमय राहील असे चित्र दर्शवित होती.

नांदेड शहरात सर्वत्र भगव्या पताका आणि भगवे झेंडे झळकले. जागोजागी भाजप नेत्यांकडून कार्यक्रम घेण्यात आले. यामुळे नांदेडचे वातावरण खूप वेगळेच बनले होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी आयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला जाण्याचे टाळले. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नांदेडमध्ये काही दिवसापूर्वी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे नेते अयोध्या येथील कार्यक्रमावर बहिष्कार घालत असतील तर मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्यावर बहिष्कार घालावा, असे वक्तव्य आठवले यांनी केले होते. लोकसभा निवडणूक जवळ असल्याने नांदेडमधील वातावरण पाहून पायाखालची वाळू सरकलेल्या अशोक चव्हाण यांनी रविवारी दुपारी रामभक्तांना शुभेच्छा देणारे फलक शहरात लावले. त्या फलकाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

केवळ नांदेडमध्येच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात त्या फलकाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. अशोक चव्हाण यांनी हे फलक लावत असताना स्वतःचे पद, पक्ष व इतर कोणत्याही बाबीचा उल्लेख केला नाही. महात्मा गांधी यांचे आवडते ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सिताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको संन्मती दे भगवान’ या भजनातील ओळी त्या फलकावर प्रदर्शित केल्या होत्या. शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण गैरहजर राहिले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा वावड्या असल्याचा खुलासा स्वतः अशोक चव्हाण यांनी कधीही केला नाही. तर काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय होऊन त्यांनी त्यांच्या कृतीचे उत्तर दिले होते. तरी देखील भाजप नेत्यांकडून वारंवार ते काँग्रेस सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आयोध्येतील कार्यक्रमानिमित्त रामभक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर नांदेडमध्ये झळकविल्याने ते पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मते पडणार आहेत, हे मात्र या सोहळ्यातून अधोरेखित झाले आहे. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त अकरा दिवस उपवास करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आधुनिक ‘श्रीमंत योगी’च आहेत, असा गौरव मोदींच्या बाबतीत झाल्याने आता मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील व त्यानंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा अशीच दुसरी दिवाळी साजरी होईल हे मात्र निश्चित झाले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात