मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर राष्ट्रवादी प्रकरणातील सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे. आज शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांना दिलेल्या उत्तरामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सुनावणीच्या पहिल्या दिवशी दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाडांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शरद पवार गटाच्या वकिलांनाही आव्हाडांना काही प्रश्न विचारले. यावेळी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला. यावर त्यांनी निवडणुका झाल्याचं सांगितलं. पण त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपाटात ठेवण्यात आले होते, ते गायब झाल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. यापुढे ते म्हणाले, जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांच्या पुराव्यांचं काय केलं माहीत नाही, असा दावा आव्हाडांनी केला आहे.
TV9 ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार या सुनावणीदरम्यान जितेंद्र आव्हाडांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांना दोन्ही गटाकडून शिक्षणाबद्दलही विचारण्यात आले. त्यांनी एलएलबी केलं आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आव्हाडांनी या प्रकरणाचा आणि शिक्षणाचा संबंध नसल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांना पक्षाच्या रचनेविषयीही विचारण्यात आलं.
त्यांनी पक्षाची घटना वाचली आहे का? पक्षाची संरचना काय आहे? ब्लॉक कमिटी आणि तालुका समिती सारखीच आहे का? जिल्हा आणि राज्यस्तरीय कमिटी निवडणूका झाल्या होत्या का? यासांरखे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले.