मुंबई : “राज्य सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त पॅकेजमधून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे,” असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “महाराष्ट्राने पंजाबपेक्षा अधिक नुकसानभरपाई दिली” असा दावा केला होता. मात्र हा दावा सपशेल खोटा असल्याचे किर्दत यांनी म्हटले आहे.
त्यांच्या मते, “महाराष्ट्रात कोरडवाहू शेतीसाठी फक्त हेक्टरी 18,500 रुपये, तर बागायती शेतीसाठी सुमारे 27,000 रुपये नुकसानभरपाई दिली जात आहे. याउलट, पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी सरकारने प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. हा फरक स्पष्ट दाखवतो की महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांप्रती किती उदासीन आहे.”
किर्दत पुढे म्हणाले, “पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू’ असे सांगितले होते, परंतु आता त्यांनी कर्जमाफीचा एक शब्दही उच्चारलेला नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलणारे आणि पूर्णतः असंवेदनशील आहे.”
शेवटी त्यांनी आवाहन केले की, “शेतकऱ्यांनी निराश न होता या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभी राहील.”