मुंबई – कायदा क्षेत्रातील प्रख्यात विधिज्ञ ॲड. डॉ. नीलेश वैजयंती भगवान पावसकर यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ वकील पॅनलवर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिष्ठेची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विधिजगतासह विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉ. पावसकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकारी अधिवक्ता म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, २००३ आणि सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा, २०१५ यांच्या मसुदा समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा ठसा उमटला आहे. त्यांनी मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून कार्य केले असून, सिद्धार्थ लॉ कॉलेज (माटुंगा), न्यू लॉ कॉलेज (पार्ले) आणि जे. सी. लॉ कॉलेज अशा नामांकित महाविद्यालयांत सलग १८ वर्षे अध्यापन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज न्यायालयीन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.
कायद्यावरील भक्कम पकड आणि समृद्ध अनुभवामुळे भारत सरकारने त्यांची वरिष्ठ वकील म्हणून उच्च न्यायालयासाठी निवड केली होती. शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी भारतीय राज्यघटना, प्रशासकीय कायदा आणि हिंदू कायदा या विषयांत पदव्युत्तर पदवी (एलएलएम) संपादन केली असून भ्रष्टाचारविरोधी कायदा या विषयावर विद्यावाचस्पती (पीएचडी) मिळवली आहे.