Twitter : @therajkaran
मुंबई
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मागणीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज पवईच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. पवई येथील आय आय टी मेनगेट समोर हे आंदोलन सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. यावेळी पवई परिसर ’एक मराठा लाख मराठा‘ तसेच ’आरक्षण आमच्या हक्काचे…‘ या घोषणांनी दणादणून निघाला.
दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पवईतील पंचकुटीर, तिरंदाज व्हिलेज, गोखले नगर, हरिओम नगर, चैतन्य नगर, सायगलवाडी तसेच हिरानंदानी परिसरातील मराठा समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मराठा महिलांची विशेष उपस्थिती असल्याचे दिसून आली. यावेळी आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मतं व्यक्त केली. ज्येष्ठ मराठा सुभाष लाड यांनी मराठा इतिहास उलगडून सांगत समाज एक असल्याचे सांगितले. तसेच अन्य ज्येष्ठ मराठा बांधवांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
शांततेच्या मार्गाने जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू असून यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेत सुरु असताना ते भरकटण्यासाठी प्रयत्न केले जात असून मराठा समाजाची दिशाभूल करणारी आश्वासणे देण्यापेक्षा मराठा आरक्षण जाहीर करावे, जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावे, अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या.
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत आदेशाप्रमाणे आंदोलनाचे टप्पे सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी पवईत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुंबई जिल्ह्यात मराठा समाजाच्या अनेक बैठका सुरू झाल्या असून मराठवाडा, विदर्भात सुरू असलेलं मराठा आंदोलनाचा वादळ मुंबईत पवईच्या मार्गाने थडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. अडीच तास सुरु असलेले हे ठिय्या आंदोलन पालिस उपायुक्त दत्ता नलावडे यांना मागण्यांचे निवेदन देत स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
“मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलनाचे सहा टप्पे राहणार आहेत. त्यांचे जसे आदेश असतील त्याप्रमाणे आम्ही ही आंदोलन करणार आहोत. यातील एक भाग आजचा ठिय्या आंदोलन आहे. तीव्र आंदोलनासाठी देखील आम्ही तयार आहोत.”
– पंकज लाड, मराठा आंदोलन कर्ता.
“सरकारला यावर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. आता महाराष्ट्रातील मराठे जागे व्हायला लागले आहेत. आरक्षणावर सरकारने निर्णय नाहीच घेतला तर काही तरी घडण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने यावर तोडगा त्वरीत काढावा. जरांगे-पाटील यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांना पाठींबा आहे.”
– अर्चना साळुंखे, महिला आंदोलनकर्ती
“मराठा बांधवांवर गेली कित्येक वर्षे अन्याय होत आहे. मुळात जाती आधारीत केलेले आरक्षणच मोठा अन्याय आहे. मात्र इतर जातींना जर आरक्षण देता त्याप्रमाणे मराठ्यांना देखील आरक्षण द्या. त्यांच्या मुलांना शिक्षण नोकरीत संधी मिळेल. त्यासाठी जरांगे-पाटील तीच मागणी करत आहेत. तसेच कुणबी-मराठा हा भेद जो सरकारने करुन ठेवला आहे. तो मिटवणे आवश्यक आहे. यामुळे जातीजातीत फार मोठी दरी निर्माण होत आहे. जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीत सुधार व्हावा, ही प्रार्थना तसेच सरकारलाही आरक्षण मिळवून देण्याची बुद्धी व्हावी.”
-सुभाष लाड, ज्येष्ठ मराठा आंदोलक