मुंबई : महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यात गुंतवणूक वाढीसह रोजगारनिर्मितीला चालना मिळाल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
• मॅग्नेट प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जात असून १४ प्रमुख फलोत्पादन पिके आणि फुलांच्या मूल्यसाखळीचा विकास केला जात आहे.
• यात शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), प्रक्रियादार, निर्यातदार, किरकोळ विक्रेते व स्वयंसहाय्यता गटांचा सहभाग आहे.
• उद्दिष्टे : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढवणे, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षमता वाढवणे.
एडीबीच्या मदतीने शेतकरी व उद्योजकांना तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा, मध्यम मुदतीचे कर्ज आणि खेळते भांडवल पुरवले जात आहे. प्रकल्पाचा वित्तीय आराखडा १४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असून अंमलबजावणी कालावधी २०२१–२२ ते २०२७–२८ असा आहे.
या बैठकीत प्रकल्पाच्या पुढील टप्प्याबाबतही चर्चा झाली. मॅग्नेट २.० अंतर्गत उत्तम कृषी तंत्रज्ञान, पॅकेजिंग, ब्रँडींग, समृद्धी महामार्गावरील फलोत्पादन कॉरिडॉर, संस्थात्मक बळकटीकरण आणि कार्बन क्रेडिट यांचा समावेश असलेला आराखडा एडीबीच्या सहकार्याने तयार करण्यात येत आहे.