Twitter : @milindmane70
मुंबई
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मतदारसंघ सोडून दोन दिवस आधीच अनेक आमदारांनी मुंबईकडे धाव घेण्यास सुरुवात केली असल्याने येत्या आठ दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी बारा वाजल्यापासून शिवसेना शिंदे गटाच्या चाळीस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ही सुनावणी दोन दिवस चालणार आहे. सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडे दाखल 34 याचिकादेखील निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सुनावणीमुळे राज्यात येत्या आठ दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत राजकीय निरीक्षकांकडून प्राप्त होत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना बंडखोर गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिला तर त्याचा परिणाम प्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर राहणार की जाणार याबाबत देखील राजकीय निरीक्षकांकडून उलट – सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे गटाकडे असलेले शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील जाणार की राहणार याबाबत देखील राजकीय निरीक्षकांकडून वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत आहेत.
राज्यात शिवसेना पक्ष फुटीनंतर दीड वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील घरघर लागली व राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत दिल्लीच्या भाजप नेत्यांनी शब्द दिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून वारंवार केला जातो. त्यातच अजित पवार यांनी राज्यात सर्वत्र शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. अजित पवार समर्थकांनी त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे.
तशात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्याने त्यांना बदलून अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या परिस्थितीत 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रते संदर्भात होणाऱ्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेतात याबाबत शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
यांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती – : एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भारत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, चिमणराव आबा पाटील, महेश शिंदे या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय दिला तर हे सर्वजण सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतात.
शिवसेनेच्या ज्या 14 आमदारांना नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे: सुनील प्रभू (मालाड), राजन साळवी (राजापूर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर ), सुनील राऊत (विक्रोळी), वैभव नाईक (कुडाळ मालवण), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख (बाळापुर ), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी ), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर (जोगेश्वर), संजय पोतनीस (कालिना).
सुनावणी दरम्यान अध्यक्ष कोणते प्रश्न विचारणार व कोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत, याबाबत एकत्रित चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील 40 आमदारांनी व ठाकरे गटातील 14 आमदार मंगळवारी मुंबईत दाखल होतील. आपल्या राजकीय भवितव्याचा फैसला काय होणार याबाबत त्यांना चिंताग्रस्त केले असल्याने अनेक आमदार तणावाखाली असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.