विश्लेषण ताज्या बातम्या राष्ट्रीय

धक्कादायक सर्वे : भाजपला देश पातळीवर आणि महाराष्ट्रात “इतक्या” जागा गमवाव्या लागतील?

Twitter: @vivekbhavsar

मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बौद्धिक संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या “प्रबोधिनी”ने केलेला सर्वे आणि “संघा”ने देशभरातील एकेक जागेचा घेतलेला आढावा या मंथनातून निघालेले निष्कर्ष भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत धक्कादायक आहेत. या अभ्यास आणि सर्वेतून भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागांचा फटका बसणार आहे तर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना,  भाजपा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या युतीची विद्यमान जागा राखताना दमछाक होणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर मोदी-२.० पर्वाचा मोठा बोल-बाला करण्यात आला होता. अयोध्या राम मंदिराचा शिलान्यास, समान नागरी कायदा आणण्याकडे सुरू असलेली वाटचाल आणि जी-२०जी परिषदेच्या यजमान पदाच्या माध्यमातून भाजपच्या सोशल मीडियातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होणारा गवगवा हे सारे मुद्दे मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये पक्षाला तारण्यास पुरेसे नसतील, असा हा प्रबोधिनीचा सर्वे आणि संघाचा अभ्यास सांगत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षातील कार्यकाळाला उतरती कळा लागली असून देशभर भाजप आणि मोदींच्या विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाल्याचा दावा काँग्रेस करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर (Bharat Jodo Yatra) भाजपने त्यांची केलेली पप्पू ही प्रतिमा पुसून टाकण्यात राहुल गांधी केवळ यशस्वी झाले नाहीत, तर मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात राहुल गांधी यशस्वी झाल्याचे म्हटले जाते. कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला मिळालेले बहुमत ही भारत जोडो यात्रेचीच परिणीती असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत. 

मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराकडे (Manipur Riot) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने फिरवलेली पाठ, तीन महिने या मुद्द्यावर तोंडातून अवाक्षर न काढणे, पेट्रोल आणि सिलेंडरचे वाढते दर, त्यामुळे सामान्य गृहिणींचे मोडलेले कंबर आणि मध्यमवर्गीयांचा बिघडलेला मासिक जमा खर्च, हिंदुत्वाच्या नावावर देशभर सुरू असलेला उच्छाद, यामुळे त्रस्त झालेले सामान्य नागरिक आता उघडपणे मोदी यांच्या विरोधात बोलू लागले आहेत, याकडे काँग्रेस नेते लक्ष वेधत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मागील काही दिवसात निवडक पत्रकारांसोबत बोलताना भाजप आणि मोदींची खालावलेली प्रतिमा आणि सरकारविरुद्ध असलेला असंतोषाचा पाढाच वाचून दाखवला. नाना पटोले म्हणाले, भाजप विरोधात देशभर उभी राहिलेली “इंडिया” ही बिगर भाजपा पक्षांची आघाडी आगामी निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारेल. भाजपच्या देशभरातील किमान शंभर जागा कमी होतील असा दावा, नाना पटोले यांनी केला.

तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही खाजगीत बोलताना सांगितले होते की काँग्रेसने पंतप्रधान पदावर दावा न करण्याचा निर्णय घेऊन इंडिया आघाडीला अधिक बळ दिले आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल याची चर्चा आता नको तर निवडणूक निकालानंतर ज्याच्या सर्वाधिक जागा असतील त्याचा उमेदवार किंवा सर्व संमतीचा अन्य पक्षाचा उमेदवार हा पंतप्रधान होईल, अशी चर्चा “इंडिया”च्या या आधीच्या बैठकीत झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाला कदाचित विरोध होऊ शकेल म्हणून त्यांचे नाव पुढे न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची माहितीही पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी दिली.

“इंडिया” आघाडीच्या झालेल्या बैठकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या राज्यात इंडिया आघाडीतील जो पक्ष सत्तेत असेल किंवा प्रमुख विरोधी पक्ष असेल त्या पक्षाचा व्यक्ती उमेदवार असेल आणि इंडिया आघाडीतील अन्य सदस्य पक्ष त्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण राजकीय ताकद उभी करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. यातून यापूर्वी मतांची होणारी विभागणी टाळण्यात यश मिळेल, असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत.

“इंडिया” आघाडीचा धसका घेतलेल्या नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाचे नावच बदलण्याचा निर्णय घेतला, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. याचाच अर्थ भाजप विरोधात देशभर वातावरण असून “इंडिया”ला सामान्य जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे हे लक्षण असल्याचे पटोले म्हणाले.

दर तीन महिन्यांनी भाजपा पक्षांतर्गत सर्वे करत असते. “इंडिया”ला मिळणारा वाढता जनाधार आणि भाजप विरुद्ध असलेली सुप्त लाट याची दखल घेऊन “प्रबोधिनी”ने नुकताच एक सर्वे केल्याची माहिती भाजपमधील सूत्राने दिली. त्याशिवाय संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लोकसभेच्या प्रत्येक जागेचा आढावा घेऊन त्याचा रिपोर्ट पक्षाच्या वरिष्ठांना सादर केल्याची माहिती याच सूत्राने दिली. भाजपच्या याच सर्वेनुसार भाजपला येत्या लोकसभा निवडणूक Lok Sabha elections 2024) फक्त २१८ जागा मिळतील तर “इंडिया” आघाडीला 239 ते 256 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या लोकसभेत भाजपाचे संख्याबळ 303 आहे. याचाच अर्थ भाजपला किमान 115 जागा गमवाव्या लागतील, असे हा सर्वे सांगतो.

महाराष्ट्रात भाजपचे 23 खासदार असून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. याचाच अर्थ भाजपचे संख्याबळ 24 आहे. एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतून बंड करून भाजप बरोबर सत्ता स्थापन केली, त्यावेळी शिंदे यांच्यासोबत मूळ शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदार सोबत आले आहेत. तर बंडखोर अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक लोकसभा सदस्य आणि एक राज्यसभा सदस्य आहे. 

भाजपच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस – अजित पवार या युतीला फक्त 21 जागा मिळतील तर “इंडिया” आघाडी अर्थात महाविकास आघाडीतील (MVA) काँग्रेस पक्ष- उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Uddhav Sena) आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar faction of NCP) यांना २७ जागा मिळतील असे निरीक्षण या सर्वेतून नोंदवण्यात आले आहे. याचाच अर्थ भाजपला त्यांच्या विद्यमान 23 खासदारांना पुन्हा निवडून आणण्यामध्ये अडचणी येणार आहेत. तर शिंदे आणि अजित पवार गटाची (Ajit Pawar faction of NCP) एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे देखील खासदार निवडून आणताना दमछाक होणार आहे. 

मोदी यांच्या विरोधात देशभरातील मुस्लिम (Muslim), दलित (Dalit) आणि ख्रिश्चन (Christian) समुदाय एकवटला असून उत्तर भारतीय हिंदू समाजातील निम्नस्तरातील अर्थात मजूर आणि कामगार वर्गातील मतदार देखील भाजपच्या विरोधात गेले आहे. याचा मोठा फटका भाजपाला बसेल, असा दावा काँग्रेस करत आहे.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे