लखनऊ
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, मशिदीमध्ये पूजा सुरूच राहणार आहे. यापूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्ष उच्च न्यायालयात गेला होता. उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळून लावली.
वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणी तळघरात एक पूजारी पूजा करू शकत असल्याचा निर्णय दिला होता. आता मुस्लीम पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे.
पूजेची परवानगी मागितली होती..
न्यायालयाने शैंलेंद्र कुमार पाठक यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. पाठक यांच्या याचिकेनुसार, नाना सोमनाथ व्यास यांनी डिसेंबर १९९३ पर्यंत येथे पूजा-अर्चा केली होती. यावेळी पाठक यांनी विनंती केली होती, की वंश परंपरेनुसार पुजारी म्हणून त्यांना तळघरात जाण्यास आणि येथे पुन्हा पूजा सुरू करण्याची परवानगी द्यावी.
ASI चं सर्वेक्षण…
मशिदीच्या चार तळघरापैकी एक आजही व्यास कुटुंबाकडे आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) मशीद संकुलाचा अहवाल सार्वजनिक झाल्याच्या एका दिवसानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाचा आदेश आला. संबंधित प्रकरणात याच न्यायालयाने एएसआयने मशिदीचे सर्वेक्षण केले होते. मशिदीची निर्मिती औरंगजेब शासनादरम्यान हिंदू मंदिराच्या पाडलेल्या ढाच्यावर करण्यात आली, असा दावा हिंदू पक्षाने सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर केला होता.