यवतमाळ: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युती करू नये, अशी भूमिका अपदस्थ प्रवक्ते किशोर तिवारी यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना एक उघड पत्र लिहून सावधगिरीचा इशारा दिला आहे.
पत्रात तिवारींनी स्पष्ट केले आहे की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाषावाद आणि प्रांतवादाच्या माध्यमातून हिंदी भाषिक, मुस्लिम व इतर अल्पसंख्यांक समाजाविरोधात सातत्याने वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे मुंबई व उपनगरातील दहा महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यातील हिंदी भाषिक, दलित व अल्पसंख्यांक मतदार वर्ग शिवसेना–मनसे युतीविरोधात उभा राहण्याची शक्यता आहे.
“महाविकास आघाडी व इंडिया ब्लॉकचा प्रमुख कणा असलेला हा मतदार वर्ग जर दुरावला, तर त्याचा थेट फायदा भाजपाला होईल. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय हा अल्पसंख्यांक व हिंदी भाषिक मतदारांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला होता. मात्र मनसेसोबत युती केल्यास हाच मतदार वर्ग विरोधात जाण्याची शक्यता आहे,” असा इशारा तिवारींनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, “भाषावाद व प्रांतवादावर आधारित राजकारण हे देशहितासाठी धोकादायक आहे. मनसेसोबत युती केल्यास केवळ अल्पसंख्यांकच नव्हे तर शिवसेना सैनिकांमध्येही नाराजी वाढेल.”
तिवारींनी पत्रात मनसेच्या पूर्वीच्या कारवायांचा उल्लेख करून म्हटले आहे की, मराठी बोलत नसल्याच्या कारणावरून गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेशमधील व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली. लाऊडस्पीकरवरील अजानविरोधात मुस्लिम समाजाला धमक्या देण्यात आल्या. शांतताप्रिय महाराष्ट्रात नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या पक्षासोबत शिवसेनेची युती करणे म्हणजे ‘पायावर कुऱ्हाड मारून घेणे’ ठरेल.
किशोर तिवारी हे गेल्या ३० वर्षांपासून शेतकरी, आदिवासी व दलित हक्कांसाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवक्तेपद देण्यात आले होते, परंतु त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले. शिवसेनेतील काही नेत्यांच्या घातक भूमिकेबाबत त्यांनी पूर्वीही आवाज उठवला होता. आता मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर त्यांनी पुन्हा स्पष्ट भूमिका घेतली आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सल्ल्याकडे कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.