By: Niket Pawaskar
सिंधुदुर्ग (तळेरे): खारेपाटण येथील नाभिक समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व अनंत भिकाजी चव्हाण यांनी आपल्या मुलगा ओमकार उर्फ भिकाजी चव्हाण यांच्या लग्नातील आहेर असलदे (ता. कणकवली) येथील दिवीजा वृद्धाश्रमाला दान करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कृतीचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय चव्हाण यांनी तसेच सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी कौतुक केले.
अनंत चव्हाण हे खारेपाटण बाजारपेठेत सलून व्यवसायातून उपजीविका करणारे साधेपणाने व प्रामाणिकपणे जीवन जगणारे समाजप्रिय व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या तिन्ही मुलींचे लग्न नाभिक समाजातील सलून व्यवसाय करणाऱ्या तरुणांशी करून दिले. यावेळी मुलींच्या लग्नातील आहेर कोणतीही प्रसिद्धी न करता अनाथ आश्रमाला दान करून नवा संदेश दिला.
मुलगा ओमकारच्या लग्नातही त्यांनी हीच परंपरा कायम ठेवत मिळालेला आहेर दिवीजा वृद्धाश्रमाला दान केला. त्यांच्या या कार्याबद्दल विजय चव्हाण, राज्य सरचिटणीस राजन पवार आणि नाभिक समाजातील इतर नेत्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी विवेक परब, संतोष अपराज, गणेश चव्हाण, सौ. चव्हाण आणि वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी व वृद्ध नागरिक उपस्थित होते. वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी अनंत चव्हाण आणि उपस्थितांचे आभार मानले.
— एक सामाजिक कार्याचा अनमोल आदर्श निर्माण करणाऱ्या अनंत चव्हाण यांच्या या निस्वार्थी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.