मुंबई — मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी नागपूरस्थित अरुण जोशी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सलग १२ वर्षे त्यांनी हे अध्यक्षपद भूषविले असून, वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सावरकरभक्तांच्या एकमताने त्यांची पुनर्निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते जोशी यांनी पदभार स्वीकारला.
या निवडीमुळे मुंबईसह महाराष्ट्र तसेच देश-विदेशातील सावरकरभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी अरुण जोशी यांचे अभिनंदन केले.
अरुण जोशी यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यविस्ताराला मोठी गती मिळाली आहे. अद्ययावत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाची निर्मिती, अत्याधुनिक वॉल मॅपिंग तंत्रावर आधारित लाईट अँड साऊंड शो, पोर्ट ब्लेअर विमानतळावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची स्थापना, तसेच सावरकरांच्या निवडक ग्रंथसंपदेचे १२ प्रांतिक भाषांमध्ये भाषांतर हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे प्रकल्प ठरले आहेत.
याशिवाय सशस्त्र क्रांतिकारकांचे संग्रहालय, अंदमान कोठडीची प्रतिकृती आणि बहुभाषिक संकेतस्थळ असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. स्मारकाच्या माध्यमातून देशहिताचा विचार सर्वोच्च पातळीवर नेण्याचा आणि सावरकरांचे कृतीशील अनुयायी देशभर वाढवण्याचा त्यांचा स्पष्ट मनोदय आहे. या उपक्रमांद्वारे सावरकर विचारांचा कृतिशील वारसा जनमानसात आणि विशेषतः नव्या पिढीत अधिक व्यापकपणे रुजवण्याचे कार्य त्यांनी केले असून स्मारकाचे काम अधिक लोकाभिमुख झाले आहे.
अरुण जोशी हे गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या नागपूर येथील दैनिक युगधर्मचे प्रबंध संपादक आहेत. विविध शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कृतीशील अनुयायी म्हणून ओळख असलेल्या जोशी यांनी हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे.

