मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची कारवाई ही पूर्णतः नियोजनबद्ध होती, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणात ज्या मंत्र्यांची नावे समोर आली आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात याला पकडण्यासाठी पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. १० मार्च रोजी अन्य जिल्ह्यातील तक्रारीच्या आधारे कारवाईची सिद्धता करण्यात आली होती.
तपासात असेही समोर आले आहे की, अशोक खरात याने आपल्या तथाकथित ‘शक्तींचा’ वापर करून अनेक महिलांची दिशाभूल केली आणि त्यांच्याशी दुष्कृत्य केले. सुरुवातीला अनेक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र पोलिसांनी दिलेल्या विश्वासानंतर आता पीडित महिला पुढे येऊ लागल्या आहेत.
“हा विषय राजकारणाचा नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाचा आहे,” असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आणखी तक्रारी नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर मंगळवार, २४ मार्च रोजी सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

