मुंबई–केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने आता राज्यातील सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहेत. ‘भारत आटा’, तांदूळ आणि कांदा ही उत्पादने सहकारी ग्राहक भांडार व मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘भारत’ ब्रँडची विक्री सुरू आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री रावल यांच्या हस्ते झाला. यावेळी नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या. मंत्री रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फिरत्या वाहनांना विक्रीसाठी रवाना करण्यात आले आणि प्रातिनिधिक स्वरूपात ग्राहकांना उत्पादने वाटप करण्यात आली.
मंत्री रावल म्हणाले, “सणासुदीच्या काळात परवडणाऱ्या दरात दर्जेदार पीठ, तांदूळ आणि कांदा उपलब्ध होत असल्याने स्पर्धा वाढेल, बाजारभाव कमी होतील आणि महागाई कमी करण्यास मदत होईल. नाफेड शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करत असल्याने कमी किंमतीत उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. भविष्यात टप्प्याटप्प्याने इतर उत्पादनेही ग्राहकांपर्यंत पोहोचवावीत.”
आज विक्रीसाठी आलेल्या उत्पादनांचे दर:
• भारत आटा: प्रति किलो ₹31.50
• भारत तांदूळ: प्रति किलो ₹34
• कांदा: बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध
ग्राहकांच्या सोयीसाठी ही उत्पादने रिलायन्स रिटेल, डी-मार्ट, विशाल मार्ट यांसारख्या संघटित किरकोळ साखळ्यांमधून तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. शिवाय, थेट घरपोच सेवा देण्यासाठी मोबाईल व्हॅनचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी सांगितले.