बदलापूर : काका गोळे फाउंडेशन व मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साखळी रक्तदान शिबिर रविवारी उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल १४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले. विशेष म्हणजे या उपक्रमात तरुण वर्ग आणि महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
या शिबिरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजसेवक आणि नागरिकांनीही सहभाग नोंदवला. भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे, किरण भोईर, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते तुषार प्रभुदेसाई, प्रद्युम्न ठाकुरदेसाई, सुखदा दातीर, तात्यासाहेब सोनवणे, अविनाश खिल्लारे, धनंजय दीक्षित आणि बाळासाहेब काटदरे यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून इतरांनाही प्रेरित केले.
काका गोळे फाउंडेशन व मित्रमंडळ या उपक्रमाद्वारे गेली २१ वर्षे अखंड रक्तदान चळवळ राबवत आहेत. संस्थेचे उद्दिष्ट आहे की, वर्षभरात किमान ५०० रक्तदाते या मोहिमेत सहभागी व्हावेत, ज्यामुळे बदलापूर परिसरातील १०० हून अधिक रुग्णांना वेळेवर आणि मोफत रक्तपुरवठा करणे शक्य होईल.
या शिबिरास प्लाझ्मा आणि माया रक्तपेढीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशन व मित्रमंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
“रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला खरी दिशा देणारे हे शिबिर ठरले.

