मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींना गळाभेट दिली असती,” असे विधान केल्यानंतर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दानवे यांनी एका ट्वीटद्वारे म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जर हयात असते, तर त्यांनी शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला कधीच दारात उभं केलं नसतं, गळाभेट तर फारच दूरची गोष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले की, “धर्म विचारून हिंदूंचे प्राण घेणारे अतिरेकी कुठे आहेत, याचा सवाल बाळासाहेबांनी केला असता. संपूर्ण देश ऑपरेशन सिंदूरसाठी एकत्र उभा असताना पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी जाहीर करण्यामागे कोणाचा दबाव होता, हे त्यांनी विचारले असते.”
मराठवाड्याच्या मुद्द्यावरूनही दानवे यांनी सरकारवर टीका केली.
दानवे यांनी अमित शहांच्या मराठवाड्यावर ‘विशेष प्रेम’ दाखवण्यावरही टीका करत म्हटले की, “मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा कागदांचा गठ्ठा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. भाजप गेली १० वर्षे कोकण व कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्याची भाषा करते आहे, पण अजून एक थेंबही आलेला नाही.”
दानवे पुढे म्हणाले की, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन भाषण सुरू करणारे शाह हे विसरले की चिकलठाणा विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याची फाईल केंद्रात अजूनही धूळ खात पडून आहे.”
दानवे यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारवर व भाजपवर थेट आरोप करत कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत.