मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या भागांमध्ये तातडीने पंचनामे करून मदतकार्यास गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
राज्यातील प्रमुख भागांतील परिस्थिती:
• पुणे जिल्हा:
• दौंड – 117 मिमी, बारामती – 104.75 मिमी, इंदापूर – 63.25 मिमी पावसाची नोंद.
• बारामतीत 25 घरे अंशतः पडली. पुरात अडकलेल्या 7 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. 70 ते 80 कुटुंबांचे स्थलांतर.
• इंदापुरात 2 जणांना वाचविण्यात आले.
• सातारा जिल्हा (फलटण):
• 163.5 मिमी पावसाची नोंद. एनडीआरएफची चमू तैनात. दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना निवास व भोजनाची सुविधा देण्यात आली.
• सोलापूर जिल्हा:
• 67.75 मिमी पावसाची नोंद. माळशिरस तालुक्यात 6 जणांना सुरक्षितस्थळी हलवले.
• पंढरपूरमध्ये भीमा नदी पात्रात अडकलेल्या 3 जणांचे बचावकार्य सुरू.
• रायगड:
• वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद.
• मुंबई:
• मागील 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद.
• 6 ठिकाणी पाणी साचले, 18 ठिकाणी शॉर्टसर्किट, 5 ठिकाणी भिंत कोसळल्याच्या घटना.
• कोणतीही प्राणहानी नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणा सज्ज.
• 5 ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात.
• पुढील 24 तासांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्य प्रशासन पूर्ण तयारीत असून, आपत्कालीन मदत कार्य तत्काळ सुरू करण्यात आले आहे.