महाराष्ट्र ताज्या बातम्या

समाजवादी चळवळीचा वटवृक्ष : डॉ. जी. जी. पारिख

१९७८ साल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यापूर्वी १९७७ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाने इंदिरा गांधी यांच्या सत्तेला उलथवून केंद्रात सरकार स्थापनेत यश मिळवले होते. आणीबाणीच्या काळात (१९७५-७७) समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि मुरारजी देसाईंची संघटना काँग्रेस अशा विविध पक्षांचे नेते तुरुंगात एकत्र आले. मतभेद बाजूला ठेवून एकमताने जनता पक्षाची बीजे रुजली.

मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातही जनता पक्षाचा जोर होता. ठाणे जिल्हा जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि आहुति साप्ताहिकाचे संपादक वसंतराव त्रिवेदी यांनी या काळात डॉ. गुणवंतराय गणपतलाल उर्फ जी. जी. पारिख, प्रभूभाई संघवी आणि बी. ए. देसाई यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. वसंतराव त्रिवेदी यांनी उमेदवारी न मिळाल्यानेही आयात उमेदवाराला निवडून आणून दिले. यातून डॉ. जी. जी. पारिख यांच्याशी दीर्घकालीन स्नेहसंबंध सुरू झाले.

पत्रकारितेत कार्यरत असताना प्रा. मधू दंडवते, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, वसंत बापट, भाई वैद्य, प्रा. ग. प्र. प्रधान, हुसेन दलवाई यांसारख्या समाजवादी नेत्यांशीही परिचय झाला. डॉ. पारिख समाजवादी विचारसरणी टिकवण्यासाठी नेहमीच आग्रही राहिले. अपना बाजार, अपना बँक, सुपारीबाग, जनता केंद्र, युसुफ मेहरअली केंद्र, साने गुरुजी ट्रस्ट ही समाजवादी संस्थांची बलस्थाने त्यांच्याच प्रेरणेने अधिक बळकट झाली.

समाजवादी परंपरेचे अखंड प्रवासी

डॉ. जी. जी. पारिख यांनी आपल्या पत्नी मंगलाताईंसोबत आयुष्यभर समाजकार्य केले. मंगलाताई पारिख या राष्ट्रसेवा दलात आणि समाजवादी पक्षात सक्रिय होत्या. त्यांनी महागाईविरोधी महिलांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले तसेच मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही काम केले.

डॉ. पारिख यांचे आयुष्य म्हणजे समाजवादी झुंजारतेचा इतिहासच. युसुफ मेहरअली सेंटर या शाश्वत विकासाच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विकासाचे आदर्श उभे केले.

लढवय्या कार्यकर्त्याचे व्यक्तिमत्त्व

१९४० साली अवघ्या १६व्या वर्षी मुंबईत दाखल झालेले जी. जी. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय झाले. चर्चगेट स्टेशनवर रेल्वे रोखल्यामुळे त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास भोगावा लागला. पुढे तुरुंगवास त्यांच्यासाठी नेहमीचेच झाले. १९४७ मध्ये ते स्टुडंट्स काँग्रेस मुंबई विभागाचे अध्यक्ष झाले. समाजवादी विचारांचा ध्यास घेऊन त्यांनी आयुष्यभर लोकांसाठी लढा दिला.

खादी, सहकारी चळवळ, कामगार संघटना यांत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. खादीला फॅशन म्हणून बघा, अशी विचारसरणी त्यांनी १९७० च्या दशकातच मांडली होती.

समाजवादी वटवृक्षाची अखेरची पानगळ

३० डिसेंबर १९२४ रोजी गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे जन्मलेले डॉ. पारिख यांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानले. वयाच्या १०२व्या वर्षी, २ ऑक्टोबर २०२५ या गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपले पार्थिव ज. जी. समूह रुग्णालयाला देऊन देहदान करण्याचा निर्णय घेत समाजासाठीची शेवटची निस्वार्थ सेवा त्यांनी केली.

पांढरी शुभ्र दाढी, खादीचे वस्त्र, मनमिळावू हसरा चेहरा – हा समाजवादी वटवृक्ष म्हणजे डॉ. जी. जी. पारिख. त्यांचा उत्साह, लढाऊ वृत्ती आणि विचारांची निष्ठा ही समाजवादी चळवळीची खरी शिदोरी आहे.

या महान समाजवादी विभूतीस विनम्र अभिवादन!

Avatar

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात