X: @milindmane70
महाड: महाड तालुक्यात जमीन खरेदी विक्री जोरात असल्याने तालुक्यात ग्रामीण भागात अनेक भागात फार्म संस्कृती उदयास आली आहे. यातील अनेक फार्म हाऊसवर अवैध उद्योग सुरु असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांची या फार्म हाऊसवर करडी नजर आहे. गेले काही दिवस या फार्म हाऊसबाबत चौकशीचा फेरा सुरु आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्याने फार्म हाऊस मालकांचे धाबे दणाणले आहे.
महाड तालुक्याची २०११ च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या ४१ हजार २३६ तर ग्रामीण भागातील १ लाख ३८ हजार ९५५ आहे. महाड तालुक्याचे क्षेत्रफळ 796.67 चौरस मीटर आहे. महाड तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून महसुली गावांची संख्या १८८ आहे. या १३४ ग्रामपंचायतींच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणावर मुंबई व पुण्यामधील धनिकांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून अल्प भावात जमिनी खरेदी करून त्यावर आलिशान फार्म हाऊस बांधले आहेत.
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक करून शेतकऱ्यांच्या नावाखाली आलिशान फार्म हाऊस बांधले गेले आहेत. या फार्म हाऊस मध्ये स्विमिंग पूल व मोठ्या प्रमाणावर आलिशान लॉज बांधले आहेत. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचा कोणताही परवाना न घेता केवळ फार्म हाऊस ही संकल्पना धरून हे आलिशान फार्म हाऊस बांधले आहेत.
महाड तालुक्यात दुर्गम व डोंगराळ भागात असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागा कवडीमोल भावात घेऊन त्यावर झाडे लागवड करण्याच्या नावाखाली आलिशान फार्म हाऊस बांधले जात आहेत. त्यामध्ये मुंबई व पुण्यातील ग्रुप तयार करून शनिवार व रविवार या दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी पार्ट्या, त्याचप्रमाणे जुगाराचे अड्डे या फार्म हाऊसवर चालू असतात. तसेच रात्री अपरात्री फार्म हाऊसवर डी.जे. लावून पर्यावरणाचा भंग केल्याचा प्रकार या फार्म हाऊसवर नित्यनियमाने घडत असल्याच्या चर्चा ग्रामीण भागातून उमटत आहेत.
महाड तालुक्यात असणाऱ्या बहुतांशी फार्म हाऊसवर रात्री अपरात्री जुगाराचे अड्डे तर दररोज चालत आहेत. या फार्महाउसवर जुगार खेळण्यासाठी महाड व आजूबाजूच्या परिसरातील धनदांडगे व्यापारी सुरक्षित ठिकाण म्हणून या ठिकाणी येतात, अशी देखील चर्चा आहे. महाड तालुक्यात असणाऱ्या फार्म हाऊसची नोंदणी अनेक ग्रामपंचायतींकडे झालेली नाही. त्यामुळे या फार्म हाऊसवर नक्की काय चालते व त्यावर कारवाई कोणी करायची असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
त्यातच तालुक्यातील काही धनदांडग्याच्या फार्म हाऊसवर आठवड्यातून दोन वेळा बारबाला नाचवण्याचे उद्योग चालू असताना पोलीस मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प बसत आहेत. या बारबालांच्या माध्यमातून आपला उद्देश साध्य करून शासकीय अधिकाऱ्यांना खुश करण्याचा उद्योग देखील काही फार्म हाऊस चालकांकडून चालत आहे. या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणावर घरगुती सिलेंडर व हॉटेलमधील ग्राहकांना बसण्यासाठी असणारे टेबल खुर्च्या तसेच हॉटेलप्रमाणे जेवण बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व मद्यप्राशन करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर या फार्म हाऊसवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे. धनदांडग्या व्यक्तींच्या असणाऱ्या या फार्म हाऊसवर पोलिसांनी आजपर्यंत का कारवाई केली नाही? असा प्रश्न अनेक ग्रामपंचायतीमधील नागरिकांना पडला आहे.
Also Read: ओबीसींना आधार योजनेचा लाभ कधी देणार ? : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार