मुंबई: मुंबईच्या बांद्रा परिसरात भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. “बाताश्री शेलार” असा उल्लेख असलेले हे बॅनर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
शिवसेना नेते अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलेल्या या बॅनरांमध्ये शेलारांवर तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे. बॅनरवरील मजकूरात म्हटलं आहे – “अहो भाताचे शेलार, मुंबईकरांनी सध्याचे दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाथ मारून आत शिरलात. आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमच्या तोंडात माईकमध्ये!”
ही टीका शेलार यांनी नगरविकास विभागाकडे केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यासंदर्भात हाती घेतलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली होती. यासोबतच मिठी नदी परिसरातील गाळ काढण्याच्या कामाचा अहवालही मागवला होता.
शेलारांच्या या मागण्यांनंतर शिवसेनेने त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं असून, हे बॅनर केवळ राजकीय आरोपांपुरते मर्यादित न राहता सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
मुंबईतील स्थानिक राजकारणात यामुळे तापलेले वातावरण अधिकच गरम होण्याची शक्यता आहे. आता शेलार यांच्याकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.