By अजय निक्ते
मुंबई: जागतिक पातळीवर अत्यंत मानाचे समजले जाणारे वर्ल्डस बेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्टस अवॉर्ड २०२३, नुकतेच इंडोनेशिया येथे प्रदान करण्यात आले. अमेरिकेतील (USA) जगप्रसिद्ध वॉन्डरलस्ट टिप्स या ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मान्यवर माध्यम संस्थेने हा सोहळा आयोजित केला होता. गेली अनेक वर्षे जागतिक पातळीवरील सर्वोत्तम हॉटेल्स अँड रिसॉर्टसना ही अवॉर्डस प्रदान करण्यात येतात.
एकदिवसीय ग्लोबल टुरिझम परिषदेचे (Global Tourism Council) इंडोनेशियातील बाली येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशियातील ख्यातनाम व्हायोलिन वादक होअंग रॉब यांच्यासह वॉन्डरलस्ट टिप्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि अवॉर्ड समितीच्या प्रमुख क्रिस्टल ह्युअन त्रांग, इंडोनेशियाच्या अर्थ आणि पर्यटनमंत्री नीमेड आयू मार्थिनी, सौंदर्य स्पर्धेत अव्वल ठरलेल्या मिस व्हिएतनाम २०२२ (Miss Vietnam 2022) ह्युअन थी थ्यान थुई आदी मान्यवर उपस्थित होते.

दुबई येथील सेंट्रल मिराझ बीच रिसॉर्टला सर्वोत्कृष्ट फॅमिली रिसॉर्ट, ग्रेन मेलीया ना त्रांग या व्हिएतनाममधील रिसॉर्टला सर्वोत्तम लक्झरी रिसॉर्ट, सॉफीटेल बाली या रिसॉर्टला आशियातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक पर्यटन रिसॉर्ट तर इंडोनेशियाला उत्कृष्ट पर्यटन स्थळ (tourist destination) म्हणून गौरविण्यात आले. ब्राझील (Brazil) येथील फेअरमोन्ट रिओ दि जानेरो या फाईव्ह स्टार हॉटेलला सर्वोत्तम पंचतारांकित हॉटेल (Five star hotel) म्हणून तर तैवान येथील हॉटेल इंडिगो आलिशानला सर्वोच्च दर्जाचे विश्रांती रिसॉर्ट म्हणून अवॉर्ड प्रदान करण्यात आले.
जेन पेरी जॉनकस, निकोलस बौर आणि जेकब सिप या तिघांना २०२३ चे सर्वोत्कृष्ट जनरल मॅनेजर म्हणून घोषित करण्यात आले. या सोहळ्याला जगभरातील हॉटेल रिसॉर्टस अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.