प्रदेश कार्यालयात रणनितीची आखणी; माजी आमदार-खासदारांना जबाबदाऱ्या
मुंबई : आगामी महापालिका (BMC Election) व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local body election ) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (Maharashtra BJP) आपली रणनिती अधिक आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या नियोजनाची पुढची पायरी गुरुवारी पार पडली, जेव्हा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण (BJP State President Ravindra Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार आणि माजी खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पक्ष संघटनात्मक बांधणीच्या कार्यावर आणि महानगरपालिका निवडणुकांच्या रणनितीवर सखोल चर्चा झाली. यावेळी माजी आमदार व खासदारांना “एक मंडळ दत्तक घ्या” या तत्त्वानुसार विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, त्यामार्फत त्या-त्या भागातील पक्षसंघटना बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत जिल्हानिहाय संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. बूथ स्तरावरील मोर्चेबांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद वाढवणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रचार–प्रसार कसा करायचा, यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते, प्रदेश संघटन मंत्री, माजी खासदार आणि माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक केवळ सल्लामसलतीपुरती मर्यादित न राहता, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णायक रणनिती ठरवण्यासाठी होती.
‘निवडणूक लागण्याच्या आधी संघटनात्मक ताकद मजबूत करा’ ही भाजपची रणनीती स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे महानगरपालिकांच्या तोंडावर पक्ष संघटनेला अधिक मजबूत पायाभूत रचना मिळणार असून, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजुटीचा लाभ निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्व व्यक्त करत आहे.