मुंबई –“महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या राजकीय द्रष्ट्या नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः तमाशा बनवला आहे. विधीमंडळाच्या आत पत्याचा क्लब तर बाहेर WWFचा आखाडा सुरू आहे. या सर्व गोंधळाचा प्रमुख सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत,” अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सरकारवर घणाघात केला.
पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हे सरकार लोकशाही मूल्यांवर चालणारे नाही, तर ‘हम करे सो कायदा’ या शैलीने राज्यकारभार चालवतो. एका मंत्र्याच्या घरात कोट्यवधी रुपयांची बॅग सापडते, दुसरा मंत्री विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतो आणि खुद्द गृहराज्यमंत्री यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो — तरीही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प आहेत. हे सरकार लाचार, बेभरवशाचे आणि बेजबाबदार आहे.”
सपकाळ यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्था व्यवस्थेवरही चिंता व्यक्त केली. “महिला असुरक्षित आहेत, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्सचा पुरवठा होत असून तरुण पिढी नशेच्या गर्तेत अडकते आहे. कोयता गँग, अवैध धंदे, मवाली संस्कृती यांना सरकारचं मौन समर्थन आहे. पोलीस व्यवस्थेची दहशत संपलेली आहे आणि गुंडगिरी शासकीय आशीर्वादाने फोफावत आहे,” असा थेट आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबाबत विचारले असता सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वैचारिक लढाईवर आधारित आहे, शत्रुत्वावर नाही. त्यामुळे अशा सौजन्यपूर्ण शुभेच्छांमागे राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही.”